राजगुरुनगर, (वार्ताहर) : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयातील दुर्मीळ 24 पुस्तके आणि एका हस्तलिखितासह एकूण 6300 पानांच्या अमूल्य ज्ञानभांडाराचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यात आले आहे. एकीकडे कोरोनासारखे संकट असताना राजगुरुनगरचा हा अमूल्य ठेवा आता सातासमुद्रापार राहूनही वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मौखिक ते लिखित परंपरेच्या डिजिटल रूपांतरामुळे येणार्‍या पिढ्यांनाही हे ज्ञान उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी दिली.

1862मध्ये काही पोथ्या व पुस्तकांच्या भांडवलावर येथील समाज धुरंधरांनी ’जनरल नेटीव्ह लायब्ररी, खेड’ नावाने ग्रंथालयाची स्थापन केली. ज्ञान संपादनाची वास्तू म्हणून समाजानेही सहकार्याचा हात दिला. यातून वाचनालयाने प्रगती साधत पुस्तके व सभासद वाढवत नेले. त्याचबरोबर सर्व पुस्तकांचे जतनही केले या पैकी 24 पुस्तके व एक हस्तलिखिताची एकूण 6300 पाने तेही सन 1900 पूर्वीची, यांचे डिजिटायझेशन करून हा अमूल्य वैभवशाली ठेवा नव्या दिमाखात इंटरनेटवर उपलब्ध झाला आहे.

प्रकल्पाविषयी माहिती देताना सुतार म्हणाले की, सन 1832 ते 1900 पर्यंतचा हा ठेवा आहे. महाराष्ट्र शासनाच्या दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करून हा ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्था मुंबई या शासनाच्या अंगीकृत संस्थेने फेब्रुवारी 2018 मध्ये ठाणे येथे महाराष्ट्रातील शतायु वाचनालयाची दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. तेथील आवाहनास महाराष्ट्रातील 87 शतायु वाचनालयांपैकी राजगुरूनगरच्या सार्वजनिक वाचनालयाने प्रतिसाद देऊन या पथदर्शी प्रकल्पाचे प्रथम मानकरी होण्याचा मान मिळविला, याचा अभिमान वाटतो. हे सर्व साहित्य विकिमीडिया कॉमन्स या प्रकल्पात बुक्स इन मराठी या मुख्य वर्गातील बुक्स वीथ पब्लीक लायब्ररी, राजगुरुनगर पब्लीश्ड बिफोर 1900 या उपवर्गात उपलब्ध झाले आहे. तसेच विकिस्त्रोत या प्रकल्पात युनिकोडमध्ये उपलब्ध आहे. वाचक, अभ्यासक, जिज्ञासू यांना हा ठेवा मुक्तपणे व मोफत वापरता येइल. तसेच लिंक पाठवून, डाऊनलोड करून याचा प्रसार करता येईल.

विज्ञान आश्रम पाबळ येथील संस्थेचे संचालक योगेश कुलकर्णी यांनी या डिजिटायझेशन प्रकल्पातील प्रथम काम स्कॅनिंग विकी प्रकल्पात अपलोड करणे आणि ओसीआर प्रक्रीया करुन युनीकोड मध्ये रुपांतर करण्याचे काम ग्रामिण भागातील युवतींनी पुर्ण केल्याचे सांगुन , यामुळे या भागातील मुलींना आधुनीक कौशल्ये आणि रोजगारसंधी उपलब्ध झाल्याचे सांगितले.

हा सर्व ठेवा मुक्त ज्ञानस्त्रोत प्रकल्पांतर्गत पूर्ण करण्याचे काम करणार्‍या प्रोग्राम ऑफीसर, सेंटर फॉर इंटरनेट अ‍ॅन्ड सोसायटीचे कार्यक्रम अधिकारीे सुबोध कुलकर्णी यांनी या प्रक्रियेविषयी माहिती देताना सांगितले की, विस्मृतीत गेलेले व शोधण्यास अवघड असे हे मौलीक संदर्भ साहीत्य मुक्तस्त्रोतात उपलब्ध झाल्याने चिरंतन झाले आहे. त्यातील प्रत्येक शब्द आता सर्चेबल झाल्याने ग्रंथातील अनेक लपलेल्या किंवा दुर्लक्षित जागांच्या संदर्भात संशोधन , अभ्यास होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा साहीत्यास ’देशी हुन्नर’, ’विधवा विवाह’, ’भारतीय ज्योतिःशास्त्र’, ’प्रमाणशास्त्र’, ’केरळ कोकीळ’ या ग्रथांचा समावेश आहे. या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन अनेक वाचनालये असे प्रकल्प करण्यास पुढाकार घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रथम स्कॅनिंग ते ओसीआर प्रक्रिया पूर्ण करून मुक्तस्त्रोत माहिती जालावर उपलब्ध करून देताना सर्वांना ती सहज शोधनपध्दती सोपी करण्यात आली आहे. ही सर्व दुर्मिळ ग्रंथसंपदा विकिमीडिया कॉमन्सवर सार्वजनिक वाचनालय राजगुरुनगर असा शोध घेतल्यास उपलब्ध असल्याचे सांगितले.

सर्व डिजिटायझेशन प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्यातून पूर्ण केल्याचे सांगून या संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याद्वारे मराठी भाषेतील दुर्मिळ पुस्तकांचे जतन करण्याचा उद्देश असून शतायु वाचनालयाकडे असणार्‍या या दुर्मीळ ठेव्याचे जतन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत या पुस्तकांची दुरुक्ती न होण्याचा संकल्प मांडण्यात आला होता. त्यानुसार राजगुरुनगरच्या सार्वजनिक वाचनालयाने या प्रकल्पास होकार दर्शवित हा प्रकल्प पूर्ण केला असून ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. वाचक, अभ्यासक, जिज्ञासू यांना ठेवा मुक्तपणे व मोफत वाचता व डाऊनलोड करून घेता येणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा