देवस्थानांकडून भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था
पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यास परवानगी नाही. तरी योग्य खबरदारी घेत आनंदाच्या आणि उत्सहाच्या वातावरणात शनिवारी पारंपरिक पद्धतीने विविध मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी शासकीय नियमानुसार मोजक्याच व्यक्तींची उपस्थिती होती.
चतु:श्रृंगी मंदिर, तांबडी जोगेश्वरी, भवानी माता मंदिर, सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर, तळजाई माता मंदिरात काल घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेनंतर मोजकेच भक्त दर्शनाला येत असल्याचे चित्र होते. शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षी नवरात्रौत्सव विजयादशमीपर्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र काही देवस्थानांनी ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर आणि चतु:श्रृंगी देवस्थानतर्फे देवीचे दर्शन आणि सर्व धार्मिक सोहळा ऑनलाइन पाहण्याची व्यवस्था केली आहे. भाविकांना चतु:श्रृंगी देवीचे फेसबूक पेजसह यूट्यूबवरून दर्शन घेण्याची सोय करून देण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. भाविकांना देणगी देण्यासाठी विशेष ऍपद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देवीची आरती रोज सकाळी 10 वाजता आणि रात्री साडेआठ वाजता करण्यात येणार आहे. आज (रविवारी) सकाळी 8 ते 11 या वेळेत नवचंडी होम करण्यात येणार आहे. विजयादशमीनिमित्त देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात सीमोल्लंघन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा