पुणे : आम्ही कोण? या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्थलांतरीत मजुरांनी टिंबर मार्केट ते कामगार आयुक्त कार्यालय असा 8 किलोमीटरचा प्रवास करून कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडले. अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी गीत गात कष्टकर्‍यांना दाद दिली. कष्टकर्‍यांची सध्याची हलाखीची परिस्थिती समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मांडली.
डॉ. आढाव म्हणाले, मजुरांच्या हजेरीची तरतूद नसणे, राहण्याची गैरसोय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम नसणे आणि त्यामुळे पुरेशी मजूरी नसणे यामुळे स्थलांतरीत मजूरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कोरोना महामारीनंतरही सरकारने कोणत्याही उपाययोजना न केल्याने कामगारांची परिस्थिती आणखी खालावली आहे. कामगारांची कोणत्याही प्रकारची नोंद कामगार कल्याण मंडळात केलेली नाही. त्यामुळे कामगारांची नोंद करा, त्यांना मोफत रेशन द्या, राज्यसरकारच्या कामगारांसाठीच्या योजना स्थलांतरीत मजुरांनाही लागू कराव्या अशा मागण्या करण्यात आल्या.
बांधकाम मजदूर सभेचे सदस्य मोहन वाडेकर यांनी शहरी पातळीवर शहरी रोजगार हमी योजना लागू करावी, असे मत मांडले. कामगार प्रतिनिधी मंडळाद्वारे कामगार आयुक्त शशांक पोळ यांना निवेदन देण्यात आले. या प्रतिनिधीमंडळात अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार, सदस्य चंदनकुमार व रवी पाटोळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, नवसमाजवादी पर्यायचे युवराज, मोहन वाडेकर, जोहाना लोखंडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा