व्यापार्‍यांतील दोन गटामुळे गोंधळ कायम
पुणे : मार्केटयार्डातील अद्यावत फुल बाजारात तळमजल्यावर फुल बाजार असावा अशी भूमिका काही व्यापार्‍यांनी मांडली आहे, तर काही व्यापारी 5 आणि सहाव्या मजल्यावरील गाळ्यासाठी तयार आहेत. त्यामुळे व्यापारी खालचे मजले घेणार असतील, तर वरचे मजले व्यावसायिक वापरासाठी देण्याची तयारी बाजार समिती प्रशासनाने दर्शविली आहे. मात्र खालचे गाळे व्यापार्‍यांना लिलावाद्वारे घ्यावे लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास व्यापारी आणि प्रशासनात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फुलबाजार खालच्या मजल्यावर असावा की, वरच्या मजल्यावर याबाबत व्यापार्‍यात दोन गट आहेत. त्यामुळे अद्यावत फुलबाजाराचे सुमारे 50 टक्क्यापेक्षा अधिक बांधकाम झाले, तरी नेमका फुलबाजार कोठे असणार याबाबत गोंधळ कायम आहे. सन 2016 मध्ये या फुलबाजाराच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. प्रारंभी या बाजाराच्या उभारणीसाठी 54 कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बांधकाम लांबणीवर पडल्याने खर्च 100 कोटीपेक्षा अधिक होणार आहे. तर वर्षाकाठी या विभागातून बाजार समितीला 141 कोटीचे उत्पन्न मिळते. मागील चार वर्षांत प्रत्यक्षात 47 कोटीचा खर्च झाला आहे. बाजार उभारणीच्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न अत्याल्प आहे. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी जागा देऊन बाजार समितीला उत्पन्न मिळवावे लागणार आहे.
बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, नवीन फुलबाजारात 141 आडत्यांना गाळे दिले जाणार आहेत. तर गाळ्यासाठी 235 जण प्रतीक्षा यादीत आहेत. ‘फूल बाजाराचे सद्या चार मजल्याचे बांधकाम झाले आहे. ‘पहिल्या दोन मजल्यावर जागा’ द्या अशी फूल विक्रेत्यांच्या एका गटाला वाटते. पाच ते सहा मजल्यावर जागा दिली तरी दुसर्‍या गटाला चालणार आहे. फूल बाजारातून बाजार समितीला मिळणारे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे खर्च निघण्यासाठी अनेक वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी पाच व सहा मजल्यावरील जागेतील गाळे व्यावसायिक वापरासाठी लिलाव पद्धतीने द्यावे लागतील. तसेच फूल विक्रेत्यांनाही खालचे गाळे लिलाव पद्धतीने देण्याचे नियोजन सुरु आहे. त्यातून इमारतीचा खर्च वसूल करून उत्पन्नही मिळू शकेल. त्याबाबत व्यापार्‍यांशी चर्चा केली जाणार असल्याचेही गरड यांनी नमुद केले.

2022 मध्ये बाजाराचे काम पूर्ण होईल
दोन मजल्यांना महापालिकेची परवानगीची प्रतीक्षा आहे. पहिल्या चार मजल्यापर्यंत फूल विक्रेत्यांना गाळे देणार आहे. तीन मजल्यावर प्रत्येकी तीन हजार स्क्वेअर फूटाचे शीतगृह आहेत. ते नाशवंत वस्तूंसाठी भाडेतत्वावर देण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित फूल बाजार उभारण्यास सुरुवातीला 2021 पर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. मात्र, त्याला विलंब होत आहे. दोन मजल्यांना परवानगी बाकी आहे. ती मिळाल्यानंतर येत्या 2022 मध्ये हे काम पूर्णत्वास जाईल. असेही प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा