देशात २००८ मध्ये खळबळ उडवणाऱ्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील एक आरोपी सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षात प्रवेश केला.जेडीयूत त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या माजी सैनिकांच्या सेलचे राज्य संयोजक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. उत्तर प्रदेशचे जेडीयू प्रमुख अनुपसिंह पटेल यांनी १२ ऑक्टोबर रोजी त्यांचे नियुक्ती पत्र जाहीर केले.

मालेगाव बॉम्बस्फोटात कथीत सहभागासाठी महाराष्ट्र एटीएसने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यासह सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक केली होती. त्यानंतर सन २०१७ मध्ये त्यांची जामिनावर सुटका केली. बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या एका विशेष एनआयए न्यायालयात त्यांची सुनावणी सुरु आहे.

उपाध्याय पुण्याचे रहिवासी आहेत मात्र, त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलिया या ठिकाणी झाला.याच ठिकाणाहून त्यांनी अपक्ष म्हणून २०१९ ची लोकसभा निवडणुकही लढवली होती. यापूर्वी त्यांनी २०१२ मध्ये हिंदू महासभेच्या तिकीटावर बलिया जिल्ह्यातील बैरिया येथून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती.

एका खासगी वृत्तसंस्थेशी बोलताना उपाध्याय म्हणाले, “उत्तर प्रदेशात जेडीयूच्या सदस्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. चर्चेनंतर मी जेडीयूसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. माझा निवडणूक लढवण्याचा विचार नाही. मी सध्या पुण्यात राहत असलो तरी पक्षाच्या कामासाठी उत्तर प्रदेशचे दौरे करणार आहे. जेडीयूचे नेतृत्व आणि त्यांचा सामाजिक न्यायासह विकासाच्या विचारावर माझा विश्वास आहे.” आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारल्यानंतर उपाध्याय म्हणाले, “मी निर्दोष आहे.मी राष्ट्रवादी, देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात खोट्या आरोपांखाली गोवले. मी माझ्या सुटकेची वाट पाहत आहे. मी समाजासाठी काम करु इच्छितो. जेडीयू इमानदारीने गरीब आणि दलितांच्या विकासासाठी काम करीत आहे.”

उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत जेडीयूचे सरचिटणीस हरिशंकर पटेल म्हणाले, “मेजर उपाध्याय यापूर्वी दोनदा उत्तर प्रदेशातून निवडणूक लढले आहेत. बलियाहून आमचे जिल्हा प्रमुख उपाध्याय यांना ओळखत होते. त्यांनी उपाध्याय यांना जेडीयूत सहभागी होण्याबाबत विचारले.आम्ही न्यायव्यवस्थेचा आणि कायद्याचा सन्मान करतो. उपाध्याय यांना न्यायालयाने दोषी ठरवले नाही.”

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आणखी एक आरोपी साधी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने २०१९च्या निवडणुकीत भोपाळमधून लोकसभेचे तिकीट दिले होते. त्या तिथून निवडून आल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा