सूर्यकांत आसबे

सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कोसळणारा पाऊस आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूरला महापूर आला आहे! चंद्रभागा नदीचे पाणी पंढरीत शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शुक्रवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पूर आणि पावसामुळे उद्भवलेल्या नुकसानीचे भयावह वास्तव समोर आले.

पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. नदी, नाले, ओढे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. उजनी आणि वीर धरणातून सुमारे 2 लाख 73 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भीमा नदी दुधडी भरून वाहू लागली. पंढरपूर शहर आणि परिसरात पाणी शिरले. दुकाने आणि घरे पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले. पाऊस थांबला असला, तरी पाणी ओसरण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे. उभी पिके तर वाहून गेलीच, शिवाय अनेक जनावरेसुद्धा दगावली. आधीच कोरोनाने उद्ध्वस्त केले असतानाच आता पावसानेसुद्धा उरलेसुरले हिरावून घेतल्याने शेतकर्‍यांचे जगणे अवघड बनले आहे. उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे 2007 नंतर प्रथमच चंद्रभागेला सर्वांत मोठा पूर आला. प्रदक्षिणा मार्गावरील मठ पाण्यात आहेत. नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी चंद्रभागेच्या पात्रातील सर्वच होड्या शहरातील प्रमुख पेठांमध्ये पाण्यावर येऊन बचावकार्य करत आहेत. सुमारे 250 होड्यांमार्फत 1 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तालुक्यातील पटवर्धन कुरोली, शेळवे, देवडे, खेडभोसे आदी गावांना पुराचा वेढा पडला. सुमारे 8 हजार 400 नागरिकांना बाहेर काढण्यात आले. भीमा नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे शेळवेसह अनेक गावांचा संपर्क तुटला. या गावांना जोडणारे अनेक मार्ग पाण्याखाली आहेत. मका, केळी, ऊस, डाळिंब, द्राक्षे, पेरू, भाजीपाला, पाण्याखाली गेला. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या काठावरील मठ आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू; ९ बेपत्ता

परतीच्या पावसाने मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यात पावसाने 18 जणांचे बळी घेतले. तर, 9 जण बेपत्ता आहेत. सुमारे 681 जनावरे दगावली. पुरामुळे 58 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय 2 हजार 128 घरांची पडझड झाली. आतापर्यंत 32 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेे. पंढरपूर, मोहोळ आणि अक्कलकोट तालुक्यात एनडीएफआरच्या जवानांनी अनेक नागरिक व शेतकर्‍यांचा जीव वाचविला. बोटीच्या मदतीने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा