उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खंत

पुणे : पवना बंद पाईपलाईनचा प्रकल्प रखडवण्यासाठी राजकारण करण्यात आले आहे. ‘मी गोळीबार करायला लावला’ अशी अफवा पसरवून अनेकांनी निवडणुका लढविल्या आहेत, अशी खंत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करत पवना प्रकल्पावरून आता तरी राजकारण करू नये. हे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सर्व संबंधित आमदारांनी लेखी मागणी करावी, असे आवाहन देखील यावेळी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात पवना बंद पाईप लाईन व लोकांच्या पुनर्वसन विषयासंदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होेते.

पवार म्हणाले, पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाबाबत अनेक अडचणी आल्या आहेत. प्रकल्पामध्ये राजकारण आणल्याने या प्रकल्पाला विलंब झाला असल्याची स्पष्टोक्ती देखील त्यांनी दिली. त्यामुळे पवना बंद पाईप लाईनच्या कामाची स्थगिती उठवण्यासाठी सर्व संबंधित आमदारांनी लेखी मागणी करा. यासाठी पवार यांनी बैठकीत स्वत : फोन करून आमदार आण्णा बनसोडे, लक्ष्मण जगताप आणि विलास लांडगे यांना पत्र देण्यास सांगितले. अधिकार्‍यांना प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बाधित होणार्‍या लोकांना प्रत्येकी किमान दोन एकर जमीन देणे, धरणाच्या मजबुतीकरण व उंची वाढविण्याचे काम हाती घेणे, उंची वाढल्यानंतर साठणारे अतिरिक्त पाणी साठा एक टीएमसी पिंपरी-चिंचवड महापालिकेला व अर्धा टीएमसी पाणी संबंधित गावांना देण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.

पवार यांनी गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक तसेच यामध्ये गावांच्या पाणी योजनेसाठी येणारा पन्नास टक्के खर्च राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्याची तयारी देखील पवार यांनी दाखवली. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही, असे सांगून दसर्‍या दिवशी खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार या विषयाबाबत उत्तर दिले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा