खराडी : मुसळधार पावसामुळे पुणे-नगर महामार्गावरून जोरदार पाणी वाहत होते. या पाण्यात दुचाकीवरील तरुण वाहून गेल्याची घटना वाघोलीतील कावेरी हॉटेलजवळ बुधवारी घडली. सुदैवाने दोन महिला वाचल्या. दरम्यान, रात्री चार ते पाच दुचाकीही वाहून गेल्याचे समजते.

निमित अशोक अहेरवाल (वय 21 वर्षे, रा. सणसवाडी) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमित हा दुचाकीवरून चंदऩऩगरच्या दिशेने जात होता. हॉटेल कावेरीजवळ पुणे नगर महामार्गावरून जोरदार पाणी वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहामुळे तो ओेढ्याच्या दिशेने वाहून गेला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सकाळी त्या तरुणाचा मृतदेह, तसेच दुचाकी काही अंतरावर आढळून आल्या. काही दुचाकी मालकांनी आपल्या दुचाकी सकाळी काढून नेल्याचे समजते. दरम्यान, निमित हा मावशी व अन्य एका महिलेला स्टेशनवर सोडण्यासाठी दोघींना दुचाकीवर घेऊन जात होता. त्याची मावशी व अन्य दोघे जण गावी जाणार होते. त्याच्या दुचाकीच्या मागे त्याचे दाजी काही अंतरावर दुसर्‍या दुचाकीवर होते. हॉटेल कावेरीजवळ आल्यानंतर त्याने महिलांना दुचाकीवरून उतरविले. ‘तुम्ही चालत या, मी पुढे जातो’ असे तो म्हणाला. महिला उतरल्यामुळे सुदैवाने वाचल्या, तो मात्र पाण्याच्या अती वेगवान प्रवाहामुळे वाहून गेला. निमित सणसवाडी येथे आपली आई व बहिणी सोबत राहत होता. निमित अविवाहित आहे, अशी माहिती त्याचे दाजी सुभाष चौधरी यांनी दिली.

तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत कोण?

ओढे नाले बुजविणार्‍यांवर कारवाई करावी यासाठी मी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी केवळ आश्वासने दिली. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नाही. या हलगर्जीपणाचाच हा तरुण बळी पडला. या तरुणाच्या मृत्यूस जबाबदार कोण? आणखी किती बळी गेल्यानंतर पीएमआरडीला जाग येईल, असा सवाल पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी केला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा