पावसामुळे शहरात भाज्यांचा तुटवडा
पुणे : दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात मागील चार दिवसांपासून जोराचा पाऊस सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. शहरात ठिकठिकाणी भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी किरकोळ बाजारात बहुतांश प्रकारच्या फळभाज्यांच्या दराचा भडका उडाला आहे. फळभाज्यांच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर पालेभाज्यांच्या गड्डीचे दर 30 रूपयांवर पोहचले आहेत.
शहरात विभागातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होत असते. मात्र विभागात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने भाज्यांचे नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे विविध प्रकारच्या भाज्यांची काढणी थांबली आहे. पावसामुळे वाहतूकीला अडथळे येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून घाऊक बाजारात होणारी भाज्यांची आवक घटली आहे. किरकोळ बाजारातही भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या दरात 20 ते 30 रूपयाने, तर पालेभाज्यांच्या गड्डीच्या दरात 5 ते 10 रूपयांनी वाढ झाली असल्याचे नारायण पेठेतील भाज्यांचे किरकोळ विक्रेते शंतनू पटवर्धन यांनी सांगितले.
नेहमीच्या तुलनेत भाज्या उपलब्ध होत नसल्याने मिळेल त्या भाज्यांची खरेदी करावी लागत आहे. तसेच पावसाचा भाज्यांवर मारा झाल्याने दर्जा खालावला आहे. पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने विक्रीला येणार्‍या मालात खराब मालाचे प्रमाण अधिक आहे. मात्र फळभाज्या आणि पालेभाज्यांना ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याने भाज्यांचे दर तेजीत आहेत. मेथी, कोथिंबीर, कांदापात, मुळा आदींच्या गड्डीचे दर 30 रूपयावर पोहचले आहेत. तर पालक, चवळई, चुका, आंबाडीचे दर 20 ते 25 रूपया दरम्यान असल्याचेही पटवर्धन यांनी सांगितले.

किरकोळ बाजारातील फळभाज्यांचे दर
भाजी किलोचा दर
मटार 150-180
शेवगा 160
गवार 100-120
हिरवी मिरची 100
दोडका 100
घेवडा 80-100
पापडी 100
वालवर 100
फ्लॉवर 80-100
टोमॅटा 50-60

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा