पुणे : सलग तीन दिवस जोरदार ते मुसळधार पाऊस पडल्यानंतर शुक्रवारी शहरात पावसाने विश्रांती घेतली. मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते. उपनगरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. शनिवारी शहर आणि परिसरात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरात सकाळी थोडा वेळ ऊन पडले होते. मात्र नंतर आकाशात ढग दाटून आले. त्यामुळे पुन्हा जोराचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात सायंकाळपर्यंत पाऊस पडला नाही. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा पसरला आहे. शहरातील कमाल आणि किमान तपमानही स्थिर आहे. येत्या गुरूवारपर्यंत शहरात रोजच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. बुधवारी रात्री तसेच गुरूवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात कालही पाणी कायम होते. तसेच काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी साचलेलेच होते. तसेच काही भागातील रस्त्यांवर चिखलाचा राडारोडाही कायम होता.

कमी दाबाचे क्षेत्र आरबी समुद्रात
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन दिवसांपासून उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर भागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. मात्र आता हे कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून आरबी समुद्रात सरकले आहे. त्यामुळे जमीनीवरचा धोका टळला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आरबी समुद्रात सामावल्यानंतर त्यांची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली आहे. मात्र हे क्षेत्र समुद्रात खुप आत सरकले आहे. ते हळुहळू पश्चिमेकडे सरकणार असल्याचे हवामान विभागाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे सातत्य कायम आहे. आज (शनिवारी) बहुतांश कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. विदर्भ, मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील घाट विभाग तसेच मुंबई शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा