पुणे : शहर आणि परिसरात पडलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी रात्री पुन्हा एकदा पुणेकरांच्या हृदयाचा ठोका चुकविला. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची अक्षरश: झोप उडाली. सखल भागात 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचले. सोसायट्या, वस्त्यांत पाणी शिरल्याने काहींना जीव मुठीत घेऊन घरातील साहित्य बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागली. तर काहींना रात्र जागून काढावी लागली. रस्ते पाण्याखाली गेल्याने मध्यरात्रीपर्यंत हजारो लोक ठिकठिकाणी अडकले होते. शहरातील नाले दुथडी भरून वाहत होते. तर काही ठिकाणी रस्त्यांनाच नाल्याचे स्वरूप आले होते. या पावसामुळे 25 सप्टेंबर व 11 ऑक्टोबर 2019 च्या ढगफुटीची आठवण झाली.

बुधवारी सकाळपासूनच शहरात रिपरिप सुरू होती. रात्री 9.30 च्या दरम्यान शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. कात्रज, वडगाव, धायरी, खडकवासला, वारजे-माळवाडी, येरवडा, वाघोली, हडपसर परिसरात अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस पडला. रस्त्यांवर, तसेच सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने लाखोे वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच घर, वस्ती, विविध संस्था, खासगी व शासकीय कार्यालयांत पाणी शिरल्याने कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांवर पाणी आल्याने काही काळासाठी सोलापूर, सातारा मार्गासह शहरातील काही रस्ते वाहतूकीसाठी बंद करावे लागले. सखल भाग तसेच महत्त्वाच्या चौकांत सकाळपर्यंत पाणी कायम असल्याने गुरूवारी सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही.

रात्रभर शहरातील अनेक छोटे-मोठे रस्ते पाण्याखाली असल्याने गुरूवारी सकाळी बहुतांश रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि चिखल होता. अनेक विविध प्रकारच्या दुकानांत पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले आहे. दुकानातील भिजलेला माल बाहेर काढण्यात अनेकांचा कालचा दिवस गेला. ज्या रस्त्यांवर झाडे बाजूला काढण्यात आली नव्हती, अशा मार्गावरील वाहतूक बंदच होती. काल दिवसभर नाल्यांच्या पाण्याचा वेग कायम होता. शहरातील बागा आणि उद्यानाचेही नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी सीमा भिंत, घराच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असले, तरी सुदैवाने मनुष्यहानी टळली आहे.

झाडे पडली; पाणी शिरले

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सुमारे 20 ते 30 ठिकाणी झाडे कोलमडून पडल्याच्या घटना घडल्या. तर सोसाटीचे पार्किंग, दुकाने, कार्यालये अशा 70 ते 80 ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. मात्र प्रत्यक्षात याही पेक्षा अधिक ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचा फटका हजारो कुटुंबांना बसला आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुरूवारी होणार्‍या सर्व विषयांच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा रद्द करण्यात आल्या. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनातर्फे नंतर जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार

अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगत दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रात चक्राकार वारे सामावले आहे. त्यामुळे पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. मात्र तोपर्यंत हे क्षेत्र अरबी समुद्रात सरकणार आहे. त्यामुळे तीव्रता वाढली, तरी त्याचा धोका नाही. किंवा कोणत्या प्रकारचे नुकसान होणार नाही. आज (शुक्रवारी) कोकणात बर्‍याच ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळी आठपर्यंतचा पाऊस

परिसर पाऊस
शिवाजीनगर 112.1 मि.मी.
लोहगाव 125.7 मि.मी.
पाषाण 120.2 मि.मी.
कात्रज 142 मि.मी.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा