मंदिरे बंद, खराब मालामुळे दर स्थिरावले
पुणे : नवरात्रीनिमित्त दर वर्षी फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र यंदा नुकत्याच झालेल्या पावसामुळे विविध प्रकारच्या फुलांचे अतोनात नुकसान झाले आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळीसाठी राखून ठेवलेली फुले पाण्याखाली गेली आहेत. ज्या शेतकर्‍यांनी फुलांचा तोडा केला आहे. त्यातील 70 टक्के फुले खराब झाली आहेत. त्यातच शहरातील मंदिरे बंद असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मागणीत तसेच दरात निम्याने घट झाली आहे. एकीकडे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे ग्राहकांअभावी फुलांना दर मिळत नसल्याने शेतकर्‍यांची स्वप्ने अक्षरश: पावसाच्या पाण्यात विरली आहेत.
व्यापारी सागर भोसले म्हणाले, नवरात्र, दसरा, दिवाळीत शेवती आणि झेंडूच्या फुलांना मागणी असते. त्यामुळे शेतकरी फुले राखून ठेवतात. मात्र ऐन तोडणीच्या काळात आलेल्या पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. जी फुले विक्रीला येत आहेत. ती भिजलेली आहेत. त्यातच मंदिरे बंद आहेत. मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यास शासनाची परवानगी नाही. त्यामुळे मागणीही कमीच आहे. शेवतीच्या फिजलेल्या फुलांना 50 ते 100 रूपये दर मिळत आहे. तर कोरड्या आणि चांगल्या प्रतिच्या मालाला 150 ते 250 रूपये दर मिळत आहे. झेंडूच्या फुलांना 20 ते 80 रूपये दर मिळत असल्याचे भोसले यांनी नमुद केले.
घट स्थापनेच्या आदल्या दिवशी फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे दरही वाढत असतात. मात्र यंदा साध्या पद्धतीने घट स्थापना केली जाणार असल्याने फुलांना मागणी कमीच आहे. आज (शनिवारी) सर्वत्र घट स्थापना केली जाणार आहे. तरी नेहमीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या वाढली नाही. त्यात हलक्या फुलांचे प्रमाण अधिक असल्याने दरही मोठ्या प्रमाणात वाढले नाहीत. यवत, माळशिरस, नगर, सातारा येथून फुलांची आवक झाली असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

जुई 1600 रूपये किलो
शहरात दर वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ठिकठिकाणी दांडीयाचे ्रायोजन केले जाते. त्यामुळे महिलांकडून जुईच्या फुलांना मागणी असते. त्यामुळे दरही अधिक असतात. मात्र यंदा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असला, तरी जुईच्या फुलांना मागणी कायम आहे. घाऊक बाजारात शुक्रवारी एका किलोला 1400 ते 1600 रूपये दर मिळाला. आळंदी आणि तळेगाव परिसरातून जुईच्या फुलांची बाजारात आवक झाली आहे. तसेच घटासाठी विड्याच्या पानाचा तसेच तीळाच्या फुलांचा मान असल्याने विड्याची पाने आणि तीळाच्या फुलांचे दर तेजीत असल्याचेही सागर भोसले यांनी सांगितले.

भरून न निघणारे नुकसान
दीड एकरात शेवतीची फुले लावली आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे फुलांची झाडे पडली आहेत. त्यामुळे एकीकडे पावसाने, तर दुसरीकडे माती लागल्याने फुले खराब झाली आहेत. शेतीतील 40 टक्के फुलांचे नुकसान झाले आहे. फुले भिजल्याने त्याचा दर्जाही खालावला आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. पावसाने फुलोत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. -विनायक शितोळे, शेतकरी, यवत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा