पुणे : पुणे विभागात प्रामुख्याने सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शहरी भागात घरांची पडझड, रस्ते-पूल वाहून जाण्याचे प्रकार घडले. मनुष्य, तसेच पशुधनही वाहून गेले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन पुढील 24 तास सतर्कतेचे आवाहन करत नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेरीस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कालच्या पावसाने त्याचीच आठवण करून दिली.

सोलापूर : जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी, भोगावती, नागझरी नद्यांसह मोठे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील 4 हजार 522 घरांमध्ये पाणी शिरले असून, 1 हजार 338 घरांची पडझड झाली. तर 4 हजार 731 कुटुंबातील 16 हजार 954 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्ह्यात 179 मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत. आतापर्यंत 365 जनावरांचाही मृत्यू झाला. उजनी व कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना नदीला महापूर आल्याने शिवणी (ता.उत्तर सोलापूर) हे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले.

पुणे : जिल्ह्यात 24 तासांत तब्बल 112.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणे पूर्ण क्षमतेने भरली. 3 हजार 460 क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. पवना धरण शंभर टक्के भरल्याने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. इंदापूर, बारामती, पुरंदर आणि खेड तालुक्यांना अतिवृष्टीचा?मोठा फटका बसला.

सातारा : जिल्ह्यात शेतपिकांना मोठा फटका बसला असून, मोठी वित्तहानी झाली. मोराळे, गोरेगाव, येरळा, चांद नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावाचा संपर्क तुटला आहे. बाणगंगा नदीला पूर आल्याने सर्व ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. मोराळे व गोरेगाव येथील येरळा नदीवरील पुलासह अनेक लहान-सहान पूल पाण्याखाली गेले आहेत. भिलार, फलटण, मायणी, बिजवडी तालुक्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला.

कोल्हापूर : जिल्ह्यात इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले तालुक्यात जोरदार पाऊस झाला. राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. धरणातून 700 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने कसबा बावडा येथील राजाराम बंधार्‍यातील पाणीपातळी 11.5 फूट वाढली. जयसिंगपूर, शिरोळमध्ये पावसाचे पाणी साचल्याने तत्काळ मतदकार्य पाठवून येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रताळे, नाचणी, सोयाबीन, बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सांगली : जिल्ह्यातील मिरज, शिराळा, विटा तालुक्यांमध्ये मध्यरात्री पावसाने जोर धरला. तालुक्यातील भुईमूग, उडीद, बाजरी, द्राक्ष बागांना पावसाचा फटका बसला. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी नागरिकांच्या मनात गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या असल्याने नागरिकांनी घर रिकामे करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.

अहमदनगर : जिल्ह्यात पावसामुळे शेतकर्‍यांपुढे दुहेरी संकट उभे राहिले आहे. पावसामुळे पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने बाजारात आवक मंदावली. त्यामुळे कडाडलेल्या भावाचा फटका सामान्य जनतेला बसला.

विभागातील पाऊस

जिल्हा पाऊस (मिमी) सांगली 146.0
कोल्हापूर 130.0
पुणे 112.8
सातारा 85.0
सोलापूर 82.0

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा