पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी तीव्रतेचे वादळ तयार झाले आहे. हे वादळ राज्यात प्रवेश करणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुढील चार दिवस जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. येत्या गुरुवारी मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच दक्षता घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मागील चार दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारीही राज्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडला. आंध्र प्रदेशातून कमी तीव्रतेचे वादळ उद्या (बुधवारी) राज्यात धडकणार असल्याचा अंदाज आहे. मात्र या वादळाची तीव्रता कमी असणार आहे. राज्यातून हे वादळ अरबी समुद्राकडे सरकणार आहे. अरबी समुद्रात पुन्हा या वादळाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे.

शहरात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

शहरात मागील चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. आज (मंगळवारी) मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे, तर जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत शहरात रोजच पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील 24 तासांत शहरात 2.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शहरातील कमाल आणि किमान तपमान स्थिर आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा