पुणे : मान्सून सक्रीय झाल्याने मागील काही दिवसांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यात सातत्याने पाऊस पडत होता. मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यासह राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. घाट विभागात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कमाल आणि किमान तपमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली असल्याचे हवामान विभागाने मंगळवारी स्पष्ट केले.
पुणे शहर आणि परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पडणार्‍या पावसात लक्षणीय घट झाली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात मोजक्याच ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मागील 24 तासात राज्यात इगतपुरी, नागपूर, हिंगणा, तिवसा, अम्बोणे, ताम्हिणी आदी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आणखी तीन दिवस राज्यात ठिकठिकाणी केवळ पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असल्याने त्याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पुण्यातही येत्या 5 ऑक्टोंबरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र ढगाळ वातावरण निवळले आहे. सकाळपासूनच ऊन पडत असल्याने कमाल आणि किमान तपमानात वाढ झाली असल्याचेही पुणे वेधशाळेने जाहीर केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा