ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

देशात कोरोनाचा संसर्ग झाला आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे वास्तव चित्र समोर आले. त्यापूर्वी कधीकाळी आरोग्याच्या संदर्भाने फारसा विचार राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर केला गेला नाही. देशातील आरोग्य संस्था, सुविधांचा विचार गंभीरपणे केला गेला नसल्याचे वास्तव स्वीकारावे लागले. आपल्यालाच देशासाठी आपल्याच नागरिकांसाठी आरोग्याची किती वेगाने सुविधा उपलब्ध करून देण्याचे गरज असल्याचे चित्र समोर आले. सुविधेअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोना आल्याने सर्वांनाच आरोग्याचा विचार करावा लागला आहे. अशी संकटे आली तरच त्या त्या विभागाच्या गरजा पूर्ण होणार आहेत का असा प्रश्न पडतो. समस्या निर्माण झाल्यावरच त्या विभागाच्या संदर्भाने विकासाची गरज वाटते. त्याप्रमाणे शिक्षणासाठी देखील असेच एखादे संकटाची आपण वाट पाहायला हवी का? असा प्रश्न पडतो.

आपल्या देशात आरोग्य सुविधा आणि त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज अधोरेखित झाली. त्यानंतर आरोग्यासाठी आपण काहीसे प्रयत्न सुरू केले. अर्थात संकटाच्या काळात का होईना आरोग्याची गरज अधोरेखित झाली. त्यामुळे येत्या काही वर्षाच्या अर्थसंकल्पात आरोग्यावरची गुंतवणूक वाढेल अशी अपेक्षा करता येईल. यावर्षी मोठया प्रमाणावर आरोग्यासाठीच्या खर्चासाठी सरकार पुढे आले आहे. त्याप्रमाणे शिक्षणासंदर्भात देखील गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. असे संकट आल्यावरच विचार करण्याची वृत्ती राष्ट्रीय विकासासाठी निश्चित धोकादायक आहे. आरोग्य आणि शिक्षण हे विकासाचे केंद्रबिंदू आहेत. त्या विकासासाठी येथील खर्चाकडे गुंतवणूक म्हणून पाहायला हवे.

कोरोनाच्या काळात लोकांना उपचारासाठी आवश्यक सुविधा मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी सरकारी व्यवस्था झोकून काम करीत असल्याची बाब समोर आली. वारंवार ज्या खाजगीकरणाचा उदोउदो करत होतो त्या व्यवस्थेने कोरोनाच्या काळात नागरिकांशी केलेले अर्थव्यवहार समोर आले आहेत. सामान्य जनतेला न परवडणारा भार नागरिकांवर लादला जात होता. त्याचवेळी शासकीय व्यवस्था आहे त्या परिस्थितीत सामान्य जनतेकरीता धावाधाव करीत होती. सर्वाधिक जीव ओतून त्या व्यवस्थेने काम केले आहे हे कोणीच नाकारण्याची हिम्मत करणार नाही. अशा परिस्थितीत सरकारी व्यवस्था कशी कामी येते हे अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे व्यवस्थेत सरकारी शिक्षण आणि सरकारी आरोग्य सुविधांमध्ये अधिक गुंतवणुकीची गरज अधोरेखित झाली आहे.

सरकारी शिक्षणाच्या व्यवस्थेला देखील अधिक उंचावण्याकरीता गुंतवणुकीची गरज आहे. एका संकटाने आपल्याला उघडे पाडले आहे. भविष्यात शिक्षणांच्या क्षेत्रात अशी संकटे आली, तर आपली शिक्षण व्यवस्था ते पेलू शकणार आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. जगाची शिक्षणाची व्यवस्था आणि आपली वर्तमानकालीन व्यवस्था याची तुलना करून अभ्यास करण्याची नितांत गरज व्यक्त होत आहे. जगाचा संशोधनावरील खर्च, त्या संदर्भाने शिक्षणात असलेला दृष्टीकोन, शिक्षणासंदर्भाने जगाचे असलेले लक्ष आणि त्यासाठीची प्रयोगशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपला देश सर्वाधिक तरूणांचा आहे. त्यामुळे त्या तरूणांच्या देशात शिक्षण देखील तितके सशक्त असण्याची अपेक्षा आहे. तरूणांच्या क्षमतांना आव्हान देणारे, या देशातील नागरिकांच्या गरजा भागविणारी असायला हवे. शिक्षणाने भविष्याचा वेध घेणारी मानसिकता आणि सर्व क्षेत्राचे आव्हाने पेलण्याची हिम्मत दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणाने राष्ट्र व समाजाच्या गरजा भागविण्याचे आव्हान पेलण्याची गरज आहे.

नव्या शैक्षणिक धोरणात आपल्याला 2025 पर्यंत अंकीय आणि भाषिक साक्षरता पेलण्याच्या आव्हानाची भाषा आहे. धोरणातील या भाषेचे स्वागत व्हायला हवेच. आपण ते आव्हान देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात देखील पेलू शकलेलो नाही. अजूनही शंभर टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकलेले नाहीत हे वास्तव आहे. जी शाळेत आली आहेत त्यातील पाच कोटी मुले आताही शाळाबाहेर आहेत. अशा गंभीर परिस्थितीत गुणवत्तेचे आव्हान पेलावे लागणार आहे. परिस्थिती फार गंभीर नसली तरी भविष्यासाठी पावले आतापासून उचलावी लागणार आहे. जगप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ डॉ.जेफ्री साच हे भारताच्या दौर्‍यावरती आले होते. त्यांनी भारत फिरून पाहिला. त्या काळात त्यांनी येथील शाळाही पाहिल्या. भारताने प्राथमिक शिक्षणांच्या गुणवत्तेकरीता आखलेल्या योजना आणि त्या ग्रामीण भागात कुठपर्यंत पोहचल्या आहेत याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काही शाळा पाहिल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या काही मित्रांशी संवाद साधतांना काढलेले उद्गगार फारच विचार करायला लावणारे आहेत. भारतातील शाळा पाहिल्यावर भारतात बदल दिसत आहेत. मात्र तरीसुध्दा शिक्षणाच्या क्षेत्रात भारताला अजूनही खूप काम करावे लागणार आहे. त्यासाठी मात्र पुरेसा वेळ उरलेला नाही. यातील चिंता वर्तमानात देखील महत्त्वाची आहे. आपण त्या दिशेने कधी प्रवास करणार आहोत. त्यासाठी धोरण कधी घेणार आणि घेतलेल्या धोरणाची अंमलबजावणी कधी करणार हा खरा प्रश्न आहे.

जगाच्या पाठीवर अनेक देश विकासाचे चक्र गतीने फिरवत आहेत. वर्तमान परिस्थितीत आपण देखील दीर्घकालीन धोरण घेण्याची नितांत गरज आहे. जगातील अनेक देशातील सत्ताधारी आणि विरोधक हे एकत्र येऊन विचारमंथन करीत देशाचे शिक्षण धोरण राबवत आहेत. एकत्रित विकासाची चक्रे गतीने फिरण्यासाठी व्यक्तिगत आणि राजकीय मतभेद दूर सारत केवळ राष्ट्रहित लक्षात घेऊन एकमताने भूमिका घेतली जाते. धोरणावर एकमत झाल्याने ते धोरण दीर्घकालीन अंमलबजावणीत राहते. कारण त्या धोरणात राजकारणापेक्षा राष्ट्रहिताला अधिक प्राधान्य राहते. त्यामुळे सत्ता बदलत गेली आणि कोणीही सत्तेवर आले तरी शिक्षणाच्या धोरण प्रक्रियेत बदल करण्याची गरज वाटत नाही. जेव्हा राष्ट्र व समाज हे केंद्रस्थानी राहाते तेव्हा एकमत होणे साहजिक असते. त्यामुळे आपल्या देशात देखील अशा स्वरूपात एकमत व्हायला हवे. आपल्याला येणार्‍या काळात जगातील स्पर्धेला तोंड द्यायचे आहे. त्यासाठी आपण शिक्षणातून तयारी करायला हवी. आपण त्यासाठी खरेच आपण तयार आहोत का? याचा विचार करण्याची गरज आहे.

आपल्या देशात शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे. व्यापक अर्थाने गुणवत्ता म्हणजे काय या बाबत निश्चित भूमिका नाही. गुणवत्तेची व्याख्या नाही. त्यामुळे समान पातळीवर गुणवत्तेच्या संदर्भाने विचार होतांना दिसत नाही. आजही गुणवत्तेची व्याख्या सापेक्ष असल्याचे दिसते. ज्या शिक्षकाला आपला वर्ग गुणवत्तेचा आहे असे वाटते तोच वर्ग क्षेत्रीय अधिकार्‍यांना वाटेलच असे नाही. अगदी कौशल्याबाबत देखील एकमत नाही. वर्गात लिहिता वाचता येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या शंभर टक्के आहे असे सांगणार्‍या शिक्षकांचे वर्गातील विद्यार्थी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात तितकासा प्रतिसाद देत नाहीत. विद्यार्थी अक्षर, शब्द, उतारे वाचतो; पण त्यातील आकलन न होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. जेव्हा दोन वाक्यांतील अर्थ विद्यार्थी जाणत नाही तेव्हा तो केवळ अक्षरे वाचतो तेव्हा ते वाचन गुणवत्तेच्या व्याख्येत कसे बसणार हा प्रश्न आहे. अनेकदा मुले तांत्रिक पध्दतीने गणित करतात. त्यांना मार्क मिळतात; पण गणिताचा व्यावहारिक पातळीवर उपयोजनाच्या क्षमता हरवून बसतात. अनेकदा मुलांना भाषिक क्षमता प्राप्त नसतात, भाषेच्या मूल्यमापनात ते कमी मार्क मिळवितात आणि गणितात मात्र अधिक मार्क मिळवितात. जेथे भाषा येत नाही तेथे इतर विषयात मिळणारे मार्क म्हणजे आकलन युक्त शिक्षण आहे का? असा प्रश्न आहे. त्यामुळे शिकूनही शहाणपण न येणे. शिक्षणाची उददीष्टे साध्य न होणे यासारखे प्रकार घडत जातात. त्या अर्थाने शिक्षण गुणवत्तायुक्त आहेत का? अशा प्रश्न पडतोच. त्यामुळे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची गुणवत्ता आणि दहावीच्या निकालाची गुणवत्ता यात प्रचंड अंतर पडते दोन्ही परीक्षांना एकच विद्यार्थी सामोरे जातो आणि गुणवत्तेत मात्र फरक पडतो. आता या दोन्ही परीक्षांचे उद्दिष्टे भिन्न असले, तरी देखील शिक्षण म्हणून अपेक्षित केलेल्या क्षमताची साध्यता न होणे ही देशासाठी धोकादायक आहेच. शिक्षणातून अपेक्षित केलेली गुणवत्ता प्राप्त करून देणे. त्यासाठी भूमिका धोरणात येणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने देखील शाळा महाविद्यालयांमध्ये सुविधा निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

शाळा महाविद्यालयांना ग्रंथालय असायला हवे. त्यात मुबलकता असायला हवी. प्रत्येक शाळेत प्रयोगशाळा असायला हवी. खेळाचे साहित्य पुरेसे असायला हवे. खेळाचे मैदान असायला हवे. पुरेशा शैक्षणिक साहित्याची गरज असते. माहिती तंत्रज्ञान सुविधाची उपलब्धता हवी. उत्तम भौतिक सुविधा हव्यात. उत्तम दर्जाचे शिक्षक हवेत. आता या परिस्थितीत या सुविधा देशातील किती शाळांना परिपूर्ण उपलब्ध आहेत याचेही वास्तव आहे. एकीकडे आपण ऑलिंपिकला पदके मिळविण्याच प्रयत्न करतो आहोत. छोटे देश किती पदके मिळवितात हे आपण पाहातो. त्याच वेळी आपण कोठे आहोत हे ही आपणास माहीत आहे. याचा अर्थ क्रीडा, साहित्य, संशोधन या सारख्या विविध क्षेत्रांत आपण आजही कितीतरी मागे आहोत. इतका मोठा देश असूनही पदके, पुरस्कारात मागे आहोत. याचे कारण त्यासाठीच्या सुविधा आणि मार्गदर्शनाची गरज आहे, ती भागविली जात नाही. मग त्या-त्या वेळी प्रश्न निर्माण झाले, की आपण तात्पुरत्या स्वरूपात प्रश्नाची उत्तरे शोधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो; पण त्या अल्पशा प्रयत्नाने आपल्याला फारशे यश मिळत नाही. कारण शिक्षणातून ते सातत्याने पेरावे लागेल. ते न पेरता तात्पुरती मलमपट्टीने केवळ उपाय ठरतो. त्यामुळे आपण जगाच्या दृष्टीने देश मोठा असूनही आपण ठसा उमटवण्यात कमी पडत आहोत हे मान्य करावे लागेल. केवळ शाळा सुरू ठेऊन आणि शिक्षक देऊन प्रश्न सुटणार नाही. गुणवत्तेसाठी लागणार्‍या सुविधा आणि शिक्षकांसाठी आधार ठरणार्‍या प्रशिक्षण संस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. शिक्षकांसाठी अधिक सक्षम, आधार ठरणारे संदर्भ ग्रंथालय, तज्ज्ञ मार्गदर्शकांची आणि त्याचवेळी सातत्यपूर्ण संशोधनाची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. या दृष्टीने अधिक सक्षमता आणण्याची गरज भविष्यात भासणार आहे. जग वर्तमानात ज्ञानाधारित अर्थव्यवस्था उभी करू पाहात आहे. अनेक देश त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत अशावेळी आपणही त्या दिशेने पावले टाकण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याबरोबर एका दिशेचा प्रवास सुरू ठेवण्याची गरज आहे. हा प्रवास आपल्याला भविष्यातील प्रकाशाची वाट दाखवेल. अन्यथा प्रवास सुरू राहील; पण विषमतेच्या बिजांनी पुन्हा एकदा हिंसेची वाट धरली जाण्याचा धोकाही लक्षात घ्यायला हवा.

- Advertisement -

3 प्रतिक्रिया

  1. पाच कोटी विद्यार्थी जर शाळाबाह्य असतील तर ही परिस्थिती फारशी गंभीर नाही ,असे कसे म्हणता येईल?हे प्रवाहाबाहेरील विद्यार्थी उद्या चर्या भारताचे भावी आधारस्तंभ असून शकतील का?की समाजव्यवस्था पोखरणारा , दहशतवादी गट म्हणून कार्यान्वित होऊ शकत नाही का?प्रवाहाबाहेर राहिला म्हणून या घटकांवर अन्याय झाला असे म्हणत असतानाच,जो प्रवाहात आहे त्याला जर क्वालिटी एज्युकेशन मिळाले नाही तर नेमके कशा प्रकारचे मनुष्यबळ तयार होणार आहे?हाही एक प्रश्नच आहे.दर्जेदार मनुष्यबळ निर्मिती म्हणजेच सुजाण , सुसंस्कृत, आदर्श नागरिकत्वाचा पायाच नव्हे का?

  2. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक श्री.संदिप वाकचौरे यांच्या”ऐस-पैस शिक्षण”या लेख मालिकेतील ‘शिक्षणावरील गुंतवणूक वाढण्याची गरज’ या लेखात त्यांनी मांडलेल्या शिक्षण क्षेत्रातील समस्या, अडीअडचणी, शिक्षणाचा दर्जा, व्यवहारीक क्षमता,उद्दीष्टेपूर्तीच्या उणीवा इ.बाबींशी मी सहमत आहे.निव्वळ माणूस साक्षर झाला म्हणजे सुशिक्षित-सुसंस्कृत झाला असं नाही.शिकण्याने बुद्ध्यांक वाढला म्हणजे त्यांत व्यवहार चातुर्य आले असे समजणे चूक ठरेल.म्हणून शिक्षण असे असावे की जागतिक स्पर्धेत तो तरला पाहिजे, अनेक आव्हाने पेलवण्याची हिंमत त्यात आली पाहिजे.असे दर्जेदार, माणूस घडविणारे शिक्षण अभिप्रेत आहे.
    पर्यायाने यासाठी शासनाने शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.प्रचलीत शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे आणि तद्नुसंगानेच शासनाचे पहिले पाऊल नविन आकृतीबंधाच्या स्वरुपात पडते आहे.ही काळाची गरज आहे.यासाठीच शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे नव्हेतर अपेक्षीतच आहे.धन्यवाद?

  3. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक श्री संदिप वाकचौरे यांच्या “शिक्षण भवताल”या लेख मालिकेतील”शिक्षणातून सत्याची पाऊलवाट”या लेखातून शिक्षणाविषयी मांडलेले विचार स्तूत्य आहेत.खरोखर शिक्षण हे सत्याचा प्रकाश दाखविणारेसत्याची साधना करणारे असावे.पण आज सत्याची कास धरूनचालणे
    कठीण आहे.सत्याने सर्व हिताला बाधा येते.प्रसंगी अनेकांची मने दुखावली जातात.या स्वार्थीजगात सत्यवादी माणूस एकांडी पडतो हेही सत्यच आहे.
    शिक्षण हे सत्य आहे,सत्य हे शिव असते,शिव हे सुंदर असते आणि हे सत्य आपणास शिक्षणातून मिळते.सत्यातून जाणारा मार्ग प्रकाशमान असतो,तेच शिक्षणातून साध्य करायचे असते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा