राजनाथसिंह यांची ग्वाही

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावाद अद्याप निवळलेला नाही. भारताला हा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडवायचा आहे. चीनकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. सीमेवर आपण कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत सांगितले. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि आतील भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे व दारुगोळा जमा केला आहे. भारतानेही सीमेवर पुरेसे सैन्य तैनात केले आहे. कोणताही डाव उधळून लावण्यात आपण सक्षम असून देशाची सीमा सुरक्षित राहील, अशी ग्वाहीही सिंह यांनी दिली.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाबाबत माहिती दिली.सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्वय आणि वेळ परीक्षण तंत्र आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाखचा दौरा करून जवानांचे मनोबल उंचावले. स्वतः आपणही लडाखमध्ये गेलो होतो, असेही राजनाथ म्हणाले. द्विपक्षीय करार आणि समझोते संबंध जर मानण्यात आले तर शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे आपण चीनच्या संरक्षण मंत्र्यांना मॉस्कोच्या बैठकीत सांगितले. हीच बाब परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितली, असेही राजनाथ सिह यांनी यावेळी स्पष्ट केले.

एप्रिलपासून चीनने लडाखच्या सीमेवरील सैन्यांमध्ये वाढ केली आहे. गलवान खोर्‍यामध्ये चीनने पारंपरिक गस्त घालण्याची पद्धत बदलली. मे महिन्यात अनेक भागात घुसखोरीचा प्रयत्न केला. 15 जून रोजी लष्करी संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनचेही 40 हून अधिक जवान मारले गेले. त्यानंतर, चीनने पुन्हा एकदा 29-30 ऑगस्ट रोजी पँगॉन्ग सरोवर भागात घुसखोरीचा प्रयत्न केला आणि सद्य परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला; आपल्या जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

चीन मोठ्या संख्येने सैनिक तैनात करून 1993 आणि 1996 च्या कराराचे उल्लंघन करत आहे. चीनने कराराचा सन्मान केला नाही. त्यांच्या कृतीमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आजुबाजूला संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनने सीमेवर आणि अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात सैन्य आणि दारूगोळा जमवला आहे. आपणही याविरोधात पावले उचलली आहेत, असेही राजनाथ यांनी सांगितले.

राजनाथ म्हणाले, आपले सैन्य या आव्हानाचा सामान करेल याविषयी सदनाने आश्वस्त राहावे. सैन्यावर आपला विश्वास आहे. सद्य परिस्थितीत संवेदनशील मुद्द्यांचा समावेश आहे, म्हणून अनेक गोष्टींचा खुलासा करु शकत नाही. कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही सैन्य व आयटीबीपी त्वरित तैनात करण्यात आली आहे. सरकारने बर्‍याच वर्षांत सीमेवरील पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही त्याची तरतूद दुप्पटीने वाढवली आहे.

चीनने लडाखमधील जवळपास 38 हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अनधिकृत ताबा मिळवला आहे. त्याशिवाय 1963 मधील तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने व्याप्त काश्मीरमधील 5,180 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदारीत्या चीनकडे सोपवला असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

काँग्रेसचा सभात्याग

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर चर्चेची मागणी करत काँग्रेसने सभात्याग केला. भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदारांना संरक्षणमंत्र्यांना प्रश्न विचारायचा होता. त्यांनी लोकसभा सभापतींकडे त्यासाठी मागणी केली. पण, सभापतींनी मागणी फेटाळल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा