पुणे : महाराष्ट्र अंद्धश्रदा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेले प्रमुख आरोपी विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांचा जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.

तावडे आणि भावे यांनी जुलै महिन्यांत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बचावपक्ष आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस.आर.नवंदर यांनी मंगळवारी या दोघांचाही जामीन फेटाळला. तावडेच्या वकिलांनी न्यायालयात आणखी एक अर्ज दाखल करुन तावडेला पोलीस बंदोबस्तात त्याच्या आजारी वडिलांची भेट घेण्याची परवागनी द्यावी अशी विनंती केली होती. एका खासगी वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिले.

दाभोलकर हत्या प्रकरणात सन २०१६ मध्ये अटक केलेला तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटातील एक सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सीबीआयने यापूर्वी सनातन संस्थेचे मुंबईतील वकिल संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी भावे यालाही अटक केली होती. पुनाळेकर यांना नुकताच जामीन मिळाला मात्र भावेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, सचिन पुनाळेकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे हे पाच आरोपी सध्या अटकेत आहेत. याप्रकरणाची पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला घरातून बाहेर पडल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ही घटना पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर घडली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा