दरात घसरण; पावसामुळे नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर 
 पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दरात घसरण होण्याच्या भितीने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकतेच कांद्याचे दर वाढल्याने शेतकर्‍यांना चार पैसे मिळत होते. निर्यात बंदीमुळे दरात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज आहे. त्यातच पावसामुळे शेतातील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 
जेव्हा जेव्हा निर्यात बंदी करण्यात आली. तेव्हा तेव्हा स्थानिक बाजारपेठेत दरात मोठी घसरण झाली आहे. यावेळी लॉकडाऊनमुळे शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. मात्र आता कुठे कांद्याला दर मिळण्यास सुरूवात झाली होती. कांद्याच्या विक्रीतून शेतकर्‍यांना दिलासा मिळत होता. मात्र निर्यात बंदीमुळे पुन्हा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. 
सद्य:स्थिती वखारीतला जुना कांदा विक्रीसाठी बाजारात येत आहे. पावसामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा कांदा अधिक काळ शेतकर्‍यांना वखारीत ठेवता येणार नाही. कारण कांदा अधिक खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर मिळो अथवा न मिळो तो शेतकर्‍यांना विकावाच लागणार आहे. निर्यात बंदीमुळे दोन दिवसांत बाजारातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. आवक वाढली की, दरात घसरण होण्यास प्रारंभ होईल. त्याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागेल. सद्य:स्थितीत बाजारात रोज सुमारे 200 ट्रकची आवक होत आहे. त्यास प्रति दहा किलोला 200 ते 250 रूपये दर मिळत असल्याची माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
पोमण म्हणाले, राज्यात नगर, नाशिक जिल्ह्यात कांद्यााची लागवड केली जाते. पुणे जिल्ह्यात खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कांदा लागवड करतात. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याचे रोपे वाहून गेली आहेत. त्यामुळे नवीन कांद्यााचा हंगाम  लांबणीवर पडला आहे. कर्नाटकातील बंगळुरू, हुबळी भागात कांदा लागवड केली जाते. कर्नाटकातही पाऊस सुरू आहे. कर्नाटकातील नवीन कांद्यााचा हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होतो. कर्नाटकातील नवीन कांद्यााचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्यााचा हंगाम डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. मात्र नवीन कांद्याच्या पीकांचे नुकसान झाल्याने हंगाम दीड ते दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 
बाजारातील आवक वाढेल
निर्यात बंदीच्या भितीने शेतकरी मोठ्या प्रमाणात साठवणूकीतला कांदा बाजारात विक्रीसाठी आणतील. गरजेपेक्षा अधिक माल आल्यास दर कमी होतील. त्यांचे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागेल. लॉकडाऊनमुळे  बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना आतापर्यंत कांद्या सांभाळून ठेवावा लागला. त्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च वाढला आहे. निर्यात बंदीमुळे दरात मोठी घसरण झाल्यास शेतकर्‍यांचा कांदा विक्रीतून खर्च तरी निघेल किंवा नाही अशी शंका आहे. वखारीतील कांदा आताच खराब होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे ते नुकसानही शेतकर्‍यांच सहन करावे लागणार आहे. 
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा