सीए चंद्रशेखर चितळे

प्राप्तिकराच्या वितरणपत्रकांची छाननी करणे ही प्राप्तिकर खात्याची जबाबदारी असते. सर्व करदात्यांच्या उत्पन्नाच्या माहितीची सखोल तपासणी करण्यासाठी प्राप्तिकर यंत्रणा पुरी पडत नाही. या वर्षापासून करदात्यास प्रत्यक्ष कर कार्यालयामध्ये न बोलविता संगणकीय पद्धतीने व करदाता व प्राप्तिकर अधिकारी यांची भेट न घेताच विवरणपत्रकांची छाननी करण्याची पद्धत अमलात येत आहे. त्यामुळे अपप्रकारांनादेखील मज्जाव होईल; परंतु या सर्व पार्श्वभूमीवर एक बाब प्रामुख्याने लक्षात येईल की बड्या व्यावसायिक करदात्यांची व मोठ्या भागीदारी पेढ्या, कंपन्या यांची हिशेब पुस्तके व खर्चाची पावत्या व बिले तसेच विक्रीची बिले तपासणे आणि संबंधित करविषयक तरतुदींच्या पालनाची माहिती घेणे दुरापास्त होते. सखोल तपासणीसाठी उपलब्ध वेळ अपुरा पडतो. त्यामुळे काही त्रुटी व चुका तशाच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या समस्येवरील उपाय म्हणून प्राप्तिकर कायद्यानुसार चार्टर्ड अकाउंटंटकडून हिशेब तपासणी करण्याची व या तपासणीचा अहवाल प्राप्तिकर विभागास सादर करण्याची तरतूद केली होती.

प्राप्तिकर कायद्यामधील या तरतुदीनुसार खालील व्यावसायिक वा धंदा करणार्‍या व्यक्तींना प्राप्तिकराची हिशेब तपासणी लागू आहे ः प्रामुख्याने
1) धंद्याची वर्षामधील उलाढाल किंवा ढोबळ जमा राशी रुपये एक कोटीपेक्षा अधिक असणे.

हिशेब तपासणी लागू होण्यासाठी वरील अट शिथिल करून रुपये पाच कोटी उलाढाल किंवा जमाराशी असणार्‍या धंद्यास खालील दोन अटी पूर्ण झाल्यास लागू होईल.
1) वर्षभरामध्ये धंद्यास प्राप्त झालेल्या एकंदर रकमेच्या- ज्यामध्ये विक्री, उलाढाल, ढोबळ जमा रक्कम यांपैकी 5 टक्क्यांपेक्षा अधिक रोकड नसावी. आणि
ब) वर्षामध्ये खर्चासह अदा केलेल्या एकंदर रकमेच्या 5 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम रोखीने नसावी.

म्हणजेच एकंदर विक्री रु. 2 कोटी, वापरलेल्या गाडीच्या विक्रीचा रु. 5 लाख व मिळालेले व्याज रु. 10 लाख असल्यास एकंदर रु. 2.15 कोटींच्या 5 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम रोकड स्वरूपात मिळालेली नसावी किंवा एकंदर खर्च रु. 1.50 कोटी व नव्या गाडीच्या खरेदीचे रु.10 लाख असल्यास एकंदर रु. 1.60 कोटी खर्चाच्या 5 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात दिलेली नसावी.

2) चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट इ. व्यावसायिकांची वर्षामधील एकंदर जमा राशी रु. 50 लाखांपेक्षा अधिक असल्यास.
3) माल वाहतूक करणार्‍या ट्रकचा व्यवसाय (रक्कम 44 एई), खनिज तेल उत्खनन व्यवसाय (कलम 44 बी बी) अनिवासी भारतीयांचा हवाई जहाज चालविण्याचा उद्योग (कलम 44 बीबीए) यासाठी लागू असलेल्या अनुमानित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न विवरणपत्रकामध्ये नमूद करणे.
4) चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर, आर्किकेक्ट इ. व्यावसायिकांनी कलम 44 एडीएमध्ये नमूद केलेल्या उलाढालीच्या 50 टक्के या अनुमानित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न विवरणपत्रकामध्ये नमूद करणे.

5) धंदा करणारी आणि रु. दोन कोटींपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या व्यक्तींनी कलम 44 एडीमध्ये नमूद केलेल्या उलाढालीच्या 8 टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न विवतरणपत्रकामध्ये नमूद करणे.

वरीलप्रमाणे अटी लागू असणार्‍या प्रत्येक व्यवसाय व धंद्याने प्राप्तिकर कायद्यानुसार हिशेब तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. असा हिशेब तपासणीचा अहवाल 30 सप्टेंबरपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे संगणक प्रणालीमार्फत सादर करावा लागतो; परंतु या वर्षी हिशेब वर्ष 2019-20 साठीचा तपासणी अहवाल सादर करण्यासाठी, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुदत वाढवून 31 ऑक्टोबर 2020 ही केली आहे. प्राप्तिकर हिशेब तपासणी अहवाल मुदतीत सादर न केल्यास एकंदर उलाढालीच्या दीड टक्के एवढा दंड होऊ शकतो. अर्थात या दंडाच्या रकमेवर रु. 1.50 लाखाची कमाल मर्यादा घालण्यात आली आहे.

प्राप्तिकर हिशेब तपासणी अहवाल हा फॉर्म क्र. 3 सीए किंवा 3 सीबी यांपैकी लागू असलेल्या फॉर्ममध्ये द्यावा लागतो. त्यासोबत प्राप्तिकर कायद्यामधील विविध तरतुदींसंबंधी माहिती फॉर्म क्र. 3 सीडीमध्ये द्यावा लागतो. चला तर तयारीला लागा प्राप्तिकराच्या हिशेब तपासणीच्या पुढील लेखामध्ये घेऊ माहिती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा