संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

भक्तीच्या नांवाखाली लोक काहीतरी करतात. भक्ती दोन प्रकारची असते. 1.ज्ञानपूर्व भक्ती 2. ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व भक्तीला भक्ती म्हणत नाहीत. ती उपासना असते. भक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानातून आनंद निर्माण होतो व त्या आनंदातून जे करतो ती भक्ती. सर्व धर्मातील सर्व लोक नामस्मरण करतात पण नामस्मरण करणे व नामस्मरण होणे हया दोन गोष्टी भिन्न आहेत. नामस्मरण करणे ही उपासना आहे आणि संतांकडून नामस्मरण होते ही त्यांची भक्ती असते. ते जे भक्ती करतात ती देवाची करतात आणि बाकीचे जे नामस्मरण करतात ते देवाच्या मूर्तीचे करतात.मूर्ती ही डोळयासमोर आपोआप येत नाही पण प्रयत्न केल्यावर होते. नामाचा घोष करणे, नामाचा जप करणे ही उपासना आहे. खरी भक्ती ही ज्ञानातून होते. प्रपंचातसुध्दा ज्ञानातून आनंद होतो. आता परमेश्वराची खरी भक्ती होण्यासाठी त्याचे ज्ञान व्हायला हवे व त्या ज्ञानातून जे काही करतो ती खरी भक्ती असते. देव म्हणजे काय? देवाचे रूप काय? देवाचे स्वरूप काय? देवाचा व आपला संबंध काय? ही सर्व साधना चांगल्या सद्गुरूंकडून शिकून घ्यावी व ही साधना करता करता आपल्याला देवाचे ज्ञान होते व त्या ज्ञानातून आनंद निर्माण होतो व हया आनंदात आपण जे काही करतो ती खरी भक्ती असते. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचे तर ज्ञानोत्तर भक्तीत जे काही करतो त्याचे वर्णन त्यांनी असे केले आहे, त्याचे पहाणे हेच दर्शन, त्याचे ऐकणे हेच शवण, त्याचे बोलणे हिच भक्ती, त्याचे देणे घेणे हेच पूजन, तो चालतो ती प्रदक्षिणा, आणि तो झोपतो ती समाधी. ज्ञानोत्तर भक्तीतून तो जे काही करतो ते देवच करतो हया भावातून तो करतो. त्याच्या डोळयातून देवच पाहातो, त्याच्या कानाने देवच ऐकत असतो हे शब्दच नव्हेतर अमृतानुभावतून ते तो करत असतो. ज्ञानोत्तर भक्तीत काही केले तरी ते त्या भावात असेल, देवातच असेल. एक इंग्लिश लेखक म्हणतो, माझे झोपणे, उठणे, सर्व व्यवहार करणे, माझे अस्तित्व, माझे मीपण, माझे असणे हे देवातच आहे हयाला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितले तेच त्या इंग्लिश लेखकाने सांगितले. तो लेखक संत असला पाहिजे म्हणून त्यांच्यात एकवाक्यता आहे. ज्ञानोत्तर भक्ती व ज्ञानपूर्व भक्ती हयांत इतका गोंधळ आहे की तो गोंधळ दूर करण्यासाठी सद्गुरू पाहिजे. गुरू तेथे ज्ञान. गुरूकडून ज्ञान मिळते. ज्ञान दोन प्रकारचे असते. परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान. गुरू म्हणजे सद्गुरू तेही खरे सद्गुरू हयांच्याकडून जे ज्ञान मिळते ते दोन प्रकारचे असते. संसाराचे, प्रपंचाचे ज्ञान वेगळे व परमार्थाचे ज्ञान वेगळे.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा