प्रतिकारशक्ती खरेच वाढेल?

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये टप्प्याटप्प्याने सरकारी आणि खाजगी कार्यालये, तसेच इतर वाहतूक सेवा सुरू करावी. त्यामुळे मुंबईकरांमध्ये डिसेंबर आणि जानेवारीत सामूहिक प्रतिकारशक्ती वाढीस लागेल. परिणामी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येऊन, मुंबईचे जनजीवन हळूहळू रुळावर येण्यास मदत होईल. शाळा, महाविद्यालयेदेखील यासोबत सुरू करता येतील. अशी शिफारस टाटा मूलभूत संशोधन संस्थेने (टीआयएफआर) एका अहवालाद्वारे मुंबई महापालिकेला केली आहे. या अजब तर्कशास्त्राचे नवल वाटते. टाटा मूलभूत संशोधन संस्थाही सहा महिन्यांनंतर सर्व गोष्टींना परवानगी देण्यास सांगत आहे, चांगली गोष्ट आहे. मग त्यांनी तीन महिन्यानंतरच हा निर्णय का सांगितला नाही. लोकांची एकमेकांमध्ये मिसळून, सामूहिक प्रतिकारशक्ती वाढत असती तर, आज जे लोक बिनधास्त आणि बेधडक वागत आहेत, त्यांना तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे ही बंधने काढूनच टाकावीत. आज परिस्थिती अशी आहे की, हा कोरोना म्हणजे भयानक आणि जीवघेणा रोग आहे, अशी चुकीची समजूत लोकांनी करून घेतली आहे. हा कोरोना आणखी किती काळ, पाय घट्ट रोवून राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला त्याची सवय करून घेतली पाहिजे. हे खरे असले तरी, अजून काही लोक ज्यांना कोरोनाची लागण होते, त्यांच्याकडे इतर संशयित नजरेने पाहतात. काही सोसायट्यांमध्ये तर ज्यांना कोरोनाची लागण झाली असेल, त्यांना चक्क वाळीत टाकल्याप्रमाणे, वागणूक दिल्याची उदाहरणे आहेत. मग लोकांची अशी संकुचित वृत्ती असताना, ती त्यांनी प्रथम बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजात मिसळून, सामूहिक प्रतिकारशक्तीच्या गोष्टी चार हात दूरच राहिल्या.

गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली, मुंबई

कोरोनाला हरवूया

मुंबईत करोना नियंत्रणात येतोय याचे समाधान वाटत असतानाच, दुपटीचा कालावधी जो 93 दिवसांवर गेला होता, तो अल्पावधीतच पुन्हा घसरून 80 दिवसांवर आल्याचे वृत्तच काळजी करावयास लावणारे आहे. केंद्रापासून राज्यापर्यंतच्या सगळ्याच लहान मोठ्या यंत्रणा, जिवाची बाजी लावणारे अत्यावश्यक सेवेतील योद्धे प्रयत्नशील राहूनही संसर्ग वाढतोय, दुपटीचा वेग कमी होतोय याचा प्रत्येकाने अंतर्मुख होवून विचार करण्याची वेळ आलेली आहे. माझ्याकडून नियम, नियमावलींची काटेकोरपणे अमलबजावणी होते आहे ना? मी निमित्त मात्र होत नाहीना? ही जीवघेणी साखळी तोडण्यासाठी माझ्याकडूनही मी प्रयत्नशील राहीन, असे प्रत्येकाने ठरविणे गरजेचे झालेले आहे. या कोरोना काळात नागरिकांना अनेक समस्यांना, संकटांना सामोरेही जावे लागतेय, आबाळ होतेय हे मान्य आहे; परंतु हेही तितकंच खरं आहे की, नागरिकांचे सहकार्यच मोलाचे आहे.

विश्वनाथ पंडित, ठाणे

चीनबाबत कठोर धोरण हवे

चीनकडे भारताच्या तुलनेत पैसा, सैन्यशक्ती आणि आधुनिक शस्त्रास्त्रे जरी अधिक असली, तरी भारतीय सैनिकांप्रमाणे लढाऊ वृत्ती नाही. याची प्रचीती भारताने चीनला गलवान खोर्‍यात नुकतीच दिली आहे. युद्ध सैन्यशक्तीच्या आधारावर नव्हे, तर मनोबळावर लढले जाते. यासंदर्भात भारतीय सैनिक चीनपेक्षा कित्येक पटींनी सरस आहेत, हे भारताने सिद्ध केले आहे. तैवानसारखा छोटासा देशही संपूर्ण शक्ती एकवटून बलाढ्य चीनच्या डोळ्यांत डोळे घालून बोलतो. चीनचा विस्तारवाद, हेकेखोरपणा, बेभरवशी आणि विश्वास घातकी वृत्ती यामुळे भारत, अमेरिका, थायलंड यांसारख्या अनेक राष्ट्रांनी चीनशी असलेले व्यावसायिक करार रहित केले आहेत. भारताने आता चीनला प्रत्युत्तर म्हणून आहे त्यापेक्षा अधिक कठोर धोरण अवलंबवावे आणि चिनी मालावर संपूर्ण बंदी घालावी.

अपर्णा जगताप, पुणे.

दक्षिण महाराष्ट्रातही सफरचंदे पिकणार

आजपर्यंत सफरचंदे म्हटली की, हिमाचल प्रदेश किंवा काश्मीरची आठवण येत असे. काश्मीरच्या थंड प्रदेशातील टवटवीत सफरचंदे पाहून कोणास ती घेण्यास मोह होणार नाही? पण आता महाराष्ट्रातही सांगली भागात सफरचंदे पिकणार आहेत. ही बातमी नुकतीच वाचली. व्हिएतनाममधील शास्त्रज्ञांनी अगदी 45 डिग्री तापमानात विकसित होईल असे बियाणे शोधून काढले आहे. त्याच्या एकूण चार जाती आहेत. ती रोपे सांगली भागात आणून त्याची लागवड सांगली भागातील काही शेतकर्‍यांनी केली आहे. ही रोपे आणण्यासाठी एका रोपाला सुमारे 200 ते 350 रुपये खर्च येतो. या रोपांना आता चांगली फळेही आली आहेत. सांगली भागात उष्ण हवामान असल्यामुळे ही सफरचंदे दोन महिने अगोदरच बाजारात येऊ शकतात. या झाडांची लागवड जानेवारी महिन्यात केली होती. तासगाव, खंडेराजुरी, खेराडे वांगी, पाचुम्बरी येथील शेतकर्‍यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.

शांताराम वाघ, पुणे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा