नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकताच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये मोठी नाराजी आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा फेरविचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

पवार यांनी मंगळवारी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली आणि निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली. त्यावर पीयूष गोयल यांनी वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करून फेरविचार करू. सर्वांचे एकमत झाल्यास फेरनिर्णय घेऊ, असे आश्वासन दिले असल्याचे ट्विट पवार यांनी केले आहे. कांदा उत्पादक जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे. निर्यात होणार्‍या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत; पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल, असेही पवार यांनी म्हटले आहे. तसेच, भविष्यात होणारे परिणाम आपल्याला परवडणारे नाहीत, असेही पवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे आज आंदोलन

कांदा निर्यातबंदीविरोधात काँग्रेसतर्फे आज (बुधवारी) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. यासंदर्भात थोरात म्हणाले, जगभरात लॉकडाउन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकर्‍याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला चांगला भाव आल्याने चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकर्‍याला होती. परंतु, केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी जाहीर करून शेतकर्‍यांवर घोर अन्याय केला आहे. केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा