ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने मारली बाजी

न्यूयॉर्क : ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने 2020 च्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत डॉमनिक थीमने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केले. डॉमनिक थीमच्या रुपात अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला सहा वर्षांनंतर नवा विजेता मिळाला आहे. त्याच्याआधी 2014 मध्ये क्रोएशियाच्या मारिन या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या केई निशिकोरीला पराभूत केले होते.

विशेष म्हणजे जर्मनीचा अलेक्झांड ज्वेरेव आणि ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम हे दोघेही पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. 23 वर्षीय अलेक्झांडर ज्वेरेव हा त्याच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच एखाद्या ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळला. तर 27 वर्षीय डॉमनिक थीम यूएस ओपनच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिलाच ऑस्ट्रियन टेनिसपटू ठरला.

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या डॉमनिक थीमचे हे पहिलेच ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद आहे. यूएस ओपनच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात त्याने अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केले. विशेष म्हणजे अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतरही जेतेपदावर नाव कोरल्याचे 71 वर्षांनी घडले. याआधी पांचो गोंजालेज यांनी 1949 मध्ये हा पराक्रम केला होता. पहिल्यांदाच विजेत्याचा फैसला टायब्रेकरद्वारे झाला.

दुसरीकडे 23 वर्षीय अलेक्झांडर ज्वेरेव हा मागील दहा वर्षात ग्रॅण्ड स्लॅमच्या फायनलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी त्याने अंतिम फेरीत डॉमनिक थीमला कडवी झुंज दिली. पहिले दोन सेट जिंकून त्याने सुरुवात चांगली केली. परंतु पुढील दोन सेट त्याने गमावले. तर पाचवा सेट टायब्रेकरपर्यंत नेला. परंतु यामध्ये त्याला यश आले नाही. याआधी उपांत्य सामन्यात दोन सेटमध्ये मागे पडूनही त्याने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाला 3-6, 2-6, 6-3, 6-4, 6-3 असं पराभूत करुन अंतिम फेरीत धडक दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा