डॉ केशव साठये
प्राध्यापक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

व्यक्तीच्या आयुष्यात एकसष्टीला विशेष महत्व असते. जीवनातील इतिकर्तव्यतेचा ताळेबंद तपासात तो श्रेयाची, अपश्रेयाची श्रेणी ठरवत असतो; पण संस्था म्हणून आपण जेंव्हा विचार करतो तेंव्हा मात्र परिमाण बदलते. सलग 30,32 वर्षे सार्वभौमत्व लाभलेल्या दूरदर्शनकडून आपली अपेक्षा वेगळी असते. 15 सप्टेंबर ,1959 रोजी सुरु झालेले हे माध्यम आज आपली एकसष्ठी साजरी करत आहे. देशभर पसरलेल्या जाळ्यांमुळे घराघरापर्यंत पोहोचलेले हे माध्यम आज खरे म्हणजे यशाच्या अत्युच्च शिखरावर असायला हवे होते; पण तसे ते दिसत नाही. हे असे का व्हावे याचा मी जेंव्हा विचार करु लागतो तेंव्हा आपोआपच दूरदर्शनचा वैभवाचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो.

मी दूरदर्शनला रुजू झालो 1981 साली. छोट्या पडद्याचा सुवर्णकाळ होता तो. आपली छबी या माध्यमात झळकावी म्हणून बॉलिवूडचे कलाकारही दूरदर्शनमधून फोन आला की आमच्या चमूचे हर्षभराने स्वागत करत असत. मोठमोठे गायक, लेखक, नट, डॉक्टर्स, अभिनेते, उद्योगपती, राजकारणी यांना सुद्धा या जादुई माध्यमाने मोहिनी घातली होती. विषयांचे वैविध्य ,प्रथितयश व्यक्तींचा कार्यक्रमात समावेश, विविध वयोगट ,समाजगट यानुसार कार्यक्रमाची आखणीयामुळे तसेच मराठी बरोबर हिंदी गुजराती, इंग्रजी भाषेतील कार्यक्रमांना योग्य प्रतिनिधित्व दिले गेल्यामुळे दूरदर्शनचे कार्यक्रम मुंबईच्या पेडररोड पासून ते अगदी लहान गावातील वाड्यावस्त्यांवरही लोकप्रिय झाले.

1982 च्या एशियाई खेळांच्या स्पर्धेपासून तो रंगीत झाला. नुसते रंगच नव्हे तर प्रसारणाचा दर्जा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोभेल अशा निर्मितीमूल्यांचा अविष्कार दूरदर्शनने अनेकवेळा दाखवून दिला. मार्च, 1983मध्ये झालेल्या अलिप्त राष्ट्र परिषदेच्या जागतिक प्रसारणाने दूरदर्शनचा दबदबा वाढत गेला. मुंबई दूरदर्शनच्या वतीने माझी ही या वार्तांकनासाठी नेमणूक झाली होती. अद्ययावत व्हिडिओ कॅमेरेे आणि संकलन यंत्रणा वापरून आम्ही ही परिषद अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे सातासमुद्रा पलीकडे पोहोचवली. चालू घडामोडी आणि वृत्त या बरोबरच करमणूकप्रधान कार्यक्रमांची घोडदौड जोरात होती.

1984 मध्ये आलेली ‘हम लोग’ही दूरदर्शनतर्फे सादर झालेली पहिली लोकप्रिय प्रायोजित मालिका. त्यानंतर आलेल्या बुनियाद, तमससारख्या कौटुंबिक सामाजिक मालिकांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. रामायण आणि महाभारत यांच्याप्रसारणाच्या वेळी तर रस्त्यावर कर्फ्यू असल्यासारखी परिस्थिती असायची. हे वैभवाचे दिवस 90च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत होते; पण जागतिकीकरणाच्या झंझावातात खाजगी वाहिन्यांचा प्रवेश झाल्यानंतर मात्र परिस्थिती हळूहळू बदलू लागली. प्रेक्षकांना पर्याय मिळू लागले. आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि भक्कम आर्थिक रसद यामुळे हे कार्यक्रम दूरदर्शनपेक्षा अधिक चकचकीत होऊ लागले. सवंग लोकप्रियतेवर स्वार होऊन भडक आणि अतिरंजित कार्यक्रम छोट्या पडद्यावर अवतरले. दूरदर्शनचे कार्यक्रम या वातवरणात मचूळ वाटू लागले. मग दूरदर्शनने खाजगी वाहिन्यांची नक्कल करत आपणही स्पर्धेत असल्याचा एल्गार केला; पण खाजगी वाहिन्यांचा झगमगाट ते दाखवू शकले नाहीत. आपले शक्तिस्थळ विसरुन भ्रष्ट नक्कल करण्याचा मोठा फटका दूरदर्शनला बसला. त्यात स्वायत्ततेच्या नावाखाली प्रसारभारती या संस्थेच्या पदराखाली या माध्यमाला लोटून सरकारने दूरदर्शनला आर्थिकदृष्ट्या अधिक पांगळे केले. उत्पन्न मिळवण्याची अट घातल्यामुळे बाजार शरण कार्यक्रमांची वर्दळ वाढू लागली. दूरदर्शन हे स्वतंत्रपणे कार्यक्रम निर्मिती करण्यासाठी स्थापन झाले आहे याचा विसर पडला आणि खाजगी निर्मात्यांचे कार्यक्रम बहुसंख्येने दाखवण्याची पोस्टमनची भूमिका दूरदर्शनच्या नशिबी आली.

निधीचा तुटवडा हे कारण दाखवून गेल्या 10,12 वर्षात तिथे नव्या नेमणुका झाल्या नाहीत. कर्मचार्‍यांना, अधिकार्‍यांना अतिरिक्त कार्यभार देऊन हे माध्यम दिवस ढकलत आहे. कंत्राटी स्वरुपात नेमणुका केलेली मंडळी आपल्या मगदुरानुसार कार्यक्रम निर्मिती करत आहेत. 36 सॅटेलाईट वाहिन्या, 66 स्टुडीओज असे मोठे जाळे असलेले दूरदर्शन वाहिन्यांच्या भाऊगर्दीत मागच्या बाकावर केविलवाणे होऊन बसलेले पाहताना वेदना होतात. अजूनही वेळ गेलेली नाही. वृत्तवाहिन्यांच्या भडक सादरीकरणामुळे प्रेक्षक पुन्हा दूरदर्शनच्या बातम्यांकडे वळू लागले आहेत. कोरोना संकटामुळे निर्मिती थांबलेली असताना जुन्या दूरदर्शनच्या मालिका पडद्यावर झळकू लागल्या आहेत त्याला प्रचंड प्रतिसाद आणि टीआरपी मिळतो आहे.

दूरदर्शन हे लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून सुरू झाले. माहिती, मनोरंजन आणि शिक्षण ही जबाबदारी शासनाची असायला हवी. त्यामुळे या माध्यमावर होणार्‍या खर्चाकडे व्यय म्हणून न पाहता गुंतवणूक म्हणून पाहिले गेले पाहिजे. राज्यकर्त्यांनी ढासळत्या आर्थिक विकासदराची चिंता जरुर करावी; पण त्याच बरोबर आपला सांस्कृतिक विकास दर रसातळाला जात नाही ना हे पण पाहायला हवे. यासाठी दूरदर्शनसारखी प्रसारमाध्यमे बळकट केली गेली पाहिजेत. सामाजिक सलोखा, आणि संवाद वाढवण्यात या माध्यमांचा उत्तम उपयोग होतो याचे भान दाखवायला हवे. या माध्यमाला नवसंजीवनी देण्यासाठी काय काय केले पाहिजे हे समजून घेण्याची इच्छाशक्ती दाखवली, तर 61 वर्षांचा वारसा असलेला हा आपला हक्काचा छोटा पडदा पुन्हा एकदा नव्या तेजात झळाळून उठेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा