पणजी, सुरत मार्गावर धावणार बस

पुणे : अनलॉकनंतर जिल्हातंर्गत धावणार्‍या एसटी बसने दुसर्‍या टप्यात राज्यातंर्गत प्रवासी वाहतूक सुरू केली होती. मात्र आता प्रवाशांची गरज लक्षात घेऊन आंतरराज्य मार्गावर बस सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने घेतला आहे. आज (बुधवारी) पुण्यातून पणजी आणि सुरतसाठी बस रवाना होणार आहे.
पुणे-पणजी ही बस सकाळी 5.30 वाजता शिवाजीनगर (वाकडेवाडी) बस स्थानकातून रवाना होईल. दुसर्‍या दिवशी म्हणजे उद्या (गुरूवारी) सकाळी 10 वाजता पणजी येथून बस पुण्याकडे रवाना होईल. या मार्गावर धावणारी बस साधी शयनयान असेल. तर पुणे-सुरत ही बस शिवाजीनगर (वाकडेवाडी) आगारातून सकाळी 8 वाजता रवाना होईल. तर सुरत येथून रात्री 8 वाजता पुण्यासाठी बस निघेल. या मार्गावर धावणारी बस निमआराम असेल. पुणे-पणजीसाठी 795 रूपये तिकीट आकारण्यात येणार आहे. तर पुणे-सुरत मार्गासाठी 625 रूपये तिकीट असणार आहे.
पुणे-पणजी हा प्रवास सुमारे 10 ते 11 तासांचा असणार आहे. तर पुणे-सुरतचा प्रवास सुमारे 10 तासांचा असणार आहे. कोरोनामुळे योग्य खरबदारी घेवून प्रवासी सेवा सुरू करण्यात येत आहे. पुणे-पणजी आणि पुणे-सुरत या प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची आवश्यकता नाही. या मार्गावरील दोन्ही बाजूच्या फेर्‍या 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यात येणार आहेत. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर ननावरे यांनी केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा