पुणे : मागील आठवड्यात जोरदार ते मुसळधार पाऊस पडल्यानंतर शहरात पावसाने तीन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. सकाळपासूनच आकाशात ढग होते. मात्र रात्री उशीरापर्यंत पाऊस पडला नाही. ढगाळ वातावरणामुळे हवेत काही अंशी गारवा होता. कमाल आणि किमान तपमान मंगळवारी स्थिर होते.
शहरात पावसाची विश्रांती कायम असली, तरी उद्या (बुधवारी) शहरात काही भागात मुसळधार, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. जिल्ह्यातील घाटमाथा विभागात मात्र मुसलधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून येत्या सोमवारपर्यंत शहर आणि परिसरात रोजच मध्यम स्वरूपाचा, तर घाटमाथा विभागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने मागील 24 तासात शुन्य पावसाची नोंद झाली. तर 1 जूनपासून शहरात 728.8 मि.मी. पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आणखी आठवडाभर शहरातील कमाल आणि किमान तपमान स्थिर असणार आहे.
मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार
मागील चार दिवसांपासून राज्यातील पावसाचे प्रमाण घटले आहे. मात्र उद्या (बुधवारी) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भ आणि गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मेघगर्जना आणि वीजांचा कडकडटात होणार आहे. येत्या शनिवारपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाचे सातत्य कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. राज्यातील घाटमाथा विभागात पाऊस कायम आहे. मुंबई शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा