उत्तरेकडील राज्यातून होणारी आवक घटली
पुणे : गेल्या महिन्याभरापासून बटाट्याच्या दरात वाढ सुरू आहे. किरकोळ बाजारात 25 ते 30 रुपये किलोवरून बटाट्याचे दर 50 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. उत्तरेकडील राज्यातून सध्या बटाट्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे पुढील चार महिने बटाटा तेजीत राहणार असल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी मंगळवारी व्यक्त केला.
प्रत्येक स्वयंपाकघरात रोजच कमी अधिक प्रमाणात बटाट्याचा वापर होतो. बाजारात मागणीच्या तुलनेत बटाट्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे महिन्याभरापासून बटाट्याचे दर टप्प्याटप्प्याने वाढत आहेत. इतर वेळी 25 ते 30 रुपये किलोने मिळणारे बटाटे किरकोळ बाजारात 50 रुपये किलोने मिळत आहेत. दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी आणि विक्रेते व्यक्त करीत आहेत. तुटवड्यामुळे दर तेजीतच राहणार असल्याचा अंदाज किरकोळ भाजी विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी व्यक्त केला.
बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर उत्तरेकडील राज्यात करण्यात येते. गेल्या हंगामात बटाट्याच्या लागवडीवर परिणाम झाला होता. नवीन हंगामातील बटाट्याची आवक साधारणपणे जानेवारी महिन्यात सुरू होईल. तोपर्यंत बटाट्याचे दर तेजीत राहणार आहेत. करोना संसर्गामुळे शहरातील हॉटेल अद्यााप पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. हॉटेल, खाणावळी सुरू राहिल्या असत्या तर बटाट्याचे दरात आणखी वाढ झाली असती.
मार्केटयार्डातील बटाट्याचे व्यापारी राजेंद्र कोरपे म्हणाले, बटाट्याची उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. आग्रा, इंदूर तसेच पंजाबमधील बटाटा बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतो. गेल्या हंगामात उत्तरेकडील राज्यात बटाट्याचे उत्पादन अपेक्षेएवढे झाले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बटाट्याची आवक कमी पडत आहे. घाऊक बाजारात बटाट्याचे दर तेजीत आहेत. सध्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येणारा बटाटा शीतगृहातून विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा