नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह देशातील सुमारे 10 हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर चीन पाळत ठेवत असल्याचे वृत्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, क्रीडा, माध्यम, संस्कृती आणि धर्म या क्षेत्रांसह सर्वच स्तरांतील लोकांवर चीनची नजर आहे. एवढेच नव्हे तर फौजदारी खटल्यांचा आरोप असलेल्यांवरदेखील नजर ठेवली जात आहे.

चीनस्थित ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचालींवर ठेवून आहे. या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात असून, चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. ही कंपनी केवळ महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नजर ठेवून नाही, तर अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांवरही हेरगिरी करीत आहे. इतकेच नव्हे, तर भारतातील सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासह 15 माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाईदल प्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, कॅग जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ही कंपनी ठेवत असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह ‘भारत पे’ या ‘अ‍ॅप’चे संस्थापक निपुण मेहरा आदींवर हेरगिरी करीत असल्याचे वृत्त आहे.

जगभरातील 24 लाख व्यक्तींवर पाळत

चीन केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील तब्बल 24 लाख अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून असल्याचेही वृत्त आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांचाही समावेश आहे. त्याशिवाय, अमेरिका, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आदी देशांतील उच्चपदस्थ व्यक्तींचादेखील समावेश आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा