बिहारमध्ये कर्पुरी ठाकुर व तदनंतर लालुप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय, अति मागासवर्गीय व अल्पसंख्याक जनसमूहांच्या एकजुटीतून एक शक्तिशाली राजकारणाची सुरुवात करणारे माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग (74) यांच्या निधनामुळे बिहारच्या समकालीन व भविष्यातील राजकीय घडामोडींवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या आगोदर त्यांनी लालू प्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, त्यावेळी रघुवंशजींना आपल्या प्रदीर्घ सहकार्याची आठवण करून देत लालु प्रसाद यादव यांनी ‘आप कहीं नहीं जा रहे हो !’ असे सांगत निकराची विनवणी केली होती. आता त्यांचे निधन झाल्यानंतर प्रिय मित्र रघुवंशजींना ‘अप तो बहुत दूर चलें गये !’ असे सांगत लालुजींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे !

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून त्यांनी आपला संसदीय मतदारसंघ असलेल्या इतिहास प्रसिद्ध वैशालीला राजकीय दर्जा देण्याची मागणी केली होती. काल पंतप्रधान मोदी यांनीही रघुवंशजींच्या मागणीचा विचार करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

एकूण परिस्थिती पाहता बिहारच्या आगामी निवडणुकांमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधन आणि भाजप-संयुक्त जनता दल यांची युती या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये रघुवंशजींच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या राजकीय वारसा आपणाकडेच ठेवण्यावरून तीव्र संघर्ष होणार अशी चिन्हे दिसत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या प्रथम कालखंडात रघुवंश प्रसाद सिंग यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाचा कारभार कुशलतेने करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जोरकस अंमलबजावणी केली होती. या योजनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी फारसे अनुकूल मत नोंदविले नव्हते; पण आजच्या परिस्थितीत बिहारमध्ये जे तीव्र स्वरूपाचे राजकीय ध्रुवीकरण आकारास येणार आहे, त्यामध्ये रघुवंश प्रसाद सिंग यांच्या समर्थक मतदारसमूहात कोण बाजी मारतो याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे !

प्रा. विकास देशपांडे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा