डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून कोरोना संसर्गाच्या मुद्द्यावरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. अमेरिकन सरकारने कोरोनावर चांगले काम केले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या कामासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

नेवादामध्ये प्रचारसभेत ट्रम्प बोलत होते. त्यांनी जो बिडेन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बिडेन यांना स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यातही अपयश आले होते. त्या तुलनेत कोरोना रोखण्यासाठी आम्ही चांगले काम केले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. अमेरिकेत जगात सर्वाधिक कोरोना चाचण्यात झाल्या आहेत. अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. अमेरिकेने भारतापेक्षा चार कोटी 40 लाख अधिक चाचण्या केल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला व्यक्तिश: फोन करून कोरोना चाचणीत चांगले काम केल्याचे म्हटले आहे.

कोरोनाच्या मुद्द्यावरून सतत टीका करणार्‍या माध्यमांनी मोदींचे वक्तव्य समजून घेण्याची गरज असल्याचेही ट्रम्प म्हणाले. बिडेन यांच्या कार्यकाळात कोरोनाचा प्रार्दुभाव झाला असता तर लाखो अमेरिकन नागरिकांचे प्राण गेले असते. बिडेन उपाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वात खूप कमी वेगाने आर्थिक सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षात अमेरिकन तरुणांना पुन्हा रोजगार मिळाला. देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या असून लष्कराची पुनर्रचना झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाहणीत बिडेन आघाडीवर

अमेरिकेत तीन नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार, माजी उपाध्यक्ष जो बिडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सरळ लढत होणार आहे. निवडणूक सर्वेक्षणात बिडेन सध्या आघाडीवर आहेत. मात्र, ही निवडणूक चुरशीही होणार असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीवर हॅकिंगचे सावट आहे. चीन, रशिया आणि इराणच्या हॅकर्सच्या निशाण्यावर ही निवडणूक असल्याचा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा