गुरगुरत अंगावर धावून जाणे, किंचाळणे आणि आपल्याला अपेक्षित असलेला प्रतिसाद अथवा उत्तर न मिळाल्यास थयथयाट करणे ही काही दूरचित्रवाणी वाहिन्यांची पत्रकारिता थक्क करणारी आहे. गुन्हेगार कोण आणि निर्दोष कोण या निष्कर्षावर येण्यासाठी देशात तपास आणि न्याय यंत्रणा आहे. ती जबाबदारी आपल्यावर असल्याची या वाहिन्यांची केवळ समजूत नव्हे, तर खात्री झाल्याचे दिसते. समांतर न्यायालय चालविणार्‍या या महाभागांचा बोलविता धनी भाजप असावा, ही कटु वस्तुस्थिती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मुद्दे पुढे करीत वाहिन्यांनी गलका करायचा आणि भाजपच्या नेत्या-प्रवक्त्यांनी त्यांची तळी उचलायची, हे दृश्य दररोज न चुकता दिसतेे. यातून विचार स्वातंत्र्याचे कैवारी, अशी आपली प्रतिमा होईल, असे भाजप नेत्यांना वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. याचे कारण वाहिन्यांच्या थिल्लरपणाचा सर्वसामान्यांना उबग आला आहे. सुशांतसिंगच्या मृत्यूचा मुद्दा बिहार निवडणुकीसाठी चलनी नाणे ठरणार, हे भाजपच्या दिग्गजांच्या लक्षात आले, संंभ्रम निर्माण करण्यासाठी होकायंत्र वाहिन्या हाताशी होत्याच. शिवाय महाराष्ट्र सरकारबद्दल संशय निर्माण होऊन एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते!

ताळतंत्र सोडले

केंद्रीय तपास पथके मुंबईत पोहोचताच रियाला खुनी ठरवून मोकळ्या झालेल्या निवेदकांना हर्षवायूच होणे बाकी राहिले. सीबीआय, इडी आणि एनसीबी या तीन सर्वोच्च यंत्रणा कामाला लागल्या. जी तपास यंत्रणा निरपेक्ष बुद्धीने गुप्तपणे तपास करीत असते त्या तपास यंत्रणेचे अधिकारी दर काही तासांनी माध्यमांपुढे येऊन तपासाची माहिती देऊ लागले. 26-11 मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी प्रसार माध्यमांनी जो अविवेकीपणा दाखवला त्याचीच ही पुनरावृत्ती. अशा तर्‍हेची जागरूकता एखाद्या शेतकरी किंवा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आत्महत्येबाबत दिसत नाही हे आपले दुर्दैव. ज्यावरून रान उठवले गेले तो कथित हत्येचा मुद्दा मागे पडून अमली पदार्थांचा एकमेव मुद्दा हाताशी आला आणि रियावर अटकेची कारवाई होऊन, ‘करून दाखविले’ असा डंका वाहिन्यांनी पिटला. रियाची टोळी, सुशांतचे मारेकरी अशी शेलकी विशेषणे लावून चिखलफेक सुरू झाली. कंगनासारख्या वाचाळ वीरांगना मदतीला आल्या. खासगी सोसायट्यांच्या दरवाजांवर धडका मारणे, सुरक्षा दाराच्या जाळीतून बूम पुढे करीत सुरक्षा रक्षकांना, त्या रात्री काय झाले सांगा असे दरडावणे, चौकशीसाठी निघालेल्या रियाचा अथवा अन्य संशयितांच्या मोटारींचा पाठलाग करणे, असे असंख्य उपद्व्याप करून वाहिन्यांनी ताळतंत्र सोडले. त्याच उर्मट मानसिकतेतून खालापूरमधील उद्धव ठाकरेे यांच्या फार्महाऊसकडे मोर्चा वळविण्यात आला आणि तेथे रोखले गेल्याचा कांगावा करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, असे रुदन झाले. कंगनाने शिवसेनेला दिलेले आव्हान म्हणजे जणू लोकशाहीचा बुलंद आवाज असल्याचे भासवून वाहिन्यांमधील गोबेल्स सुखावले. कहर म्हणजे कंगनाच्या बाइटसाठी चंडीगडहून मुंबईला निघालेल्या इंडिगोच्या विमानात काही माध्यमकर्मी शिरले आणि विमानातच छायाचित्रे वगैरेसाठी झटापट झाली. आपल्याला पाहिजे तीच ध्येयपत्रिका पुढे न्यायची, हे केवळ कांगावेखोर वाहिन्यांचेच नव्हे तर त्यांची सूत्रे असणार्‍यांचेही उद्दिष्ट आहे. पत्रकारितेचा आभास करून जे चालले आहे त्यामागे राजकीय हितसंबंध असल्याने ही धुळवड थांबेल असे नाही. प्रेस कौन्सिलसारखी यंत्रणा जेवढी आवश्यक आहे, तेवढाच विधिनिषेधशून्य राजकारण्यांवर लगाम गरजेचा आहे. रोजच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी वेगळीच वातावरण निर्मिती करून सामान्यांची दिशाभूल करणार्‍या वाहिन्या आणि त्यांचे सूत्रधार असलेले राजकीय पक्ष, यांच्यात गुणात्मक फरक नाही. कथित नव्या भारताची हाळी देणार्‍यांकडे आज या वाहिन्यांची सूत्रे आहेत. या खेळाकडे पाठ फिरवायची की त्यात सामील व्हायचे, याचा निर्णय विवेकी नागरिकांच्या हातात आहे!

लोकशाहीत विरोधी आवाजाला बहुमताच्या आवाजाएवढेच महत्त्व आहे, मात्र खुल्या चर्चेत आपल्या मताविरुद्ध आवाज उठल्यावर ‘चूप हो जाओ…’ असे अंगावर धावून जाण्याच्या आविर्भावात आणि मानसिक असंतुलनाचे उदाहरण दाखवीत सांगितले जाते. रिया दोषी असेल तर जरूर शिक्षा व्हावी; पण तिच्या बाईटसाठी पुढे झालेल्यांची तुलना गिधाडांबरोबर झाली, यातून तरी न्यायाचे स्वयंघोषित प्रवक्ते धडा घेतील का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा