संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

आत्म्याला आत्मतत्व, आत्माराम, आत्मदेव इतकी नांवे आहेत. त्याचे ज्ञान झाल्याशिवाय आत्मसुख, आत्मानंद संभवत नाही. हे एक गोष्ट लक्षांत ठेवायची की आनंद मग तो कुठलाही असूं दे तो ज्ञानातून निर्माण होतो. आत्मानंद बाजूला ठेवूया; पण कुठलाही आनंद, कुठलेही सुख हे ज्ञानातून निर्माण होते. पहिले ज्ञान होते मग आनंद होतो. सिक्सर मारली याचे पहिले ज्ञान होते मग टाळी मारता म्हणजे आनंद होतो. एकनाथ महाराजांची गोष्ट सांगतात. एकनाथ महाराज हिशोब करत असताना त्यांना एक पैचा हिशोब लागत नव्हता. त्यावेळी पै महत्वाचा होता. आता पैंचे महत्व वेगळेच आहे. हिशोब पूर्ण झाल्याशिवाय झोपायचे नाही हा त्यांचा शिरस्ता होता. रात्री जनार्दन स्वामींना जाग आली. एकनाथ महाराजांच्या खोलीतला दिवा का जळतो आहे हे पहाण्यासाठी ते त्यांच्या खोलीत आले. एकनाथ महाराज हिशोबात दंग होते. हे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. ते काय करतात ते पहात होते. करता करता त्यांना पैचा हिशोब लागला व त्यांनी टाळी मारली. सद्गुरूंनी विचारले, काय रे काय झाले? त्यांनी सांगितले पैचा हिशोब लागला आणि मला आनंद झाला. हिशोब लागला म्हणजे ज्ञान झाले व आनंद त्यातून निर्माण झाला. हयासाठी बुध्दी फार महत्वाची आहे. श्रध्दा ही बुध्दीच्या अधिष्ठानावर पाहिजे. या बुध्दीला शिक्षण देण्याचे काम, उन्नयन करण्याचे काम, उन्नत करण्याचे काम सद्गुरू करतात म्हणून सद्गुरू केला पाहिजे, सद्गुरू करायचा की न करायचा हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ज्ञानातून आनंद निर्माण होतो व आनंदातून भक्ती निर्माण होते त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. लोकांनी ज्ञानोत्तर भक्ती व ज्ञानपूर्व भक्ती यांत गोंधळ घातलेला आहे. ज्ञानपूर्व भक्तीला उपासना म्हणायचे. मी नेहमी सांगतो, परमार्थात जेवढा गोंधळ आहे तेवढा गोंधळ गोंधळीसुध्दा घालत नाही. भक्ती म्हणजे फुले वहायची, थोडा वेळ जप करायचा, एखादी पोथी वाचायची म्हणजे आपण भक्ती केली असे लोकांना वाटते. लोकांना असेही वाटते की कुठेतरी किर्तनाला जायचे, आज इथे किर्तनाला जायचे, उद्या तिथे किर्तनाला जायचे याला शवणभक्ती म्हणत नाहीत. याचे ऐकायचे, त्याचे ऐकायचे याला श्रवणभक्ती म्हणत नाहीत. म्युनिसिपाल्टीच्या कचेर्‍याच्या पेटीत कुणीही येवून कचरा टाकतो तसे आपले कान म्हणजे कचर्‍याची पेटी आहे असे वाटणारे लोक आहेत हे मला ठावूक आहे म्हणून मी सांगतो. आमचा भाचा कुठेतरी जायचा व कुणाचीतरी भक्ती करायचा. त्याच्या घरात एक फोटो होता. त्या फोटोसमोर बसून काहीतरी करणे याला तो भक्ती म्हणायचा. पुढे तो आमच्याकडे आला व मी त्याला देवाला पहायचे कसे? पहायचे कुठे? वगैरे गोष्टी शिकविल्या.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा