स्वामी केशवानंद भारती- एडनीर, केरळ यांचे निधन झाल्याचा संदेश मागील रविवारी पहाटे सव्वा चार वाजता मला मिळाला. क्षणभर विश्वासच बसेना, अगदी परवा परवापर्यंत त्यांचे एडनीर मठातील दैनंदिन चातुर्मास कार्यक्रमांचे वृत्तांत सातत्याने येत होते. त्यांची तब्येत जराशी क्षीण झालेली जाणवत होती, आवाजही काहीसा खालावला होता. एडनीर मठातील रोजची त्रिकाल पूजाअर्चना करताना त्यांची हालचाल खूपशी मंदावली होती, हेही दिसत होते. चातुर्मास समाप्तीचे सर्व शिष्य व भक्तगणांसाठी केलेले आशीर्वचन अनंत चतुर्दशीच्या नंतर आम्हा सर्वांना मठांतून त्वरित मिळाले होते. कदाचित स्वामीजींना याची पूर्वकल्पना आलेली असावी; त्यांचे आराध्यदैवत श्री दक्षिणमूर्ती व श्री गोपाळकृष्णाकडे निदान हा संपूर्ण चातुर्मास निर्विघ्नपणे पार पडावा अशी मनोमन प्रार्थना केलेली असावी.

धार्मिक परंपरा, आचरण, पावित्र्य व त्यातील सातत्य यांच्या चौकडीत येथील सर्वच धार्मिक कार्यक्रम यथासांगपणे ते पार पाडीत असत. रोजच्या दैनंदिन पूजा अर्चना यातील त्यांचे असलेले सातत्य, उत्साह, चापल्य, ऊर्मी व एकाग्रता आम्हालाच अचंबित करीत असे. कर्नाटक संगीतावरील त्यांचे प्रभुत्व हे तर त्यांच्या संगीत आराधनेतून प्राबल्याने जाणवत असे.

‘यक्षगान’ या दाक्षिण्यात्य लोकसंगीताला त्यांनी आजवर दिलेले योगदान हेही सद्य:स्थितीत उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण ठरावे. स्वामीजींच्या आध्यात्मिक क्षेत्राव्यतिरिक्त त्यांची कर्नाटक कला, नृत्य व संगीतक्षेत्राशी असलेली जवळीक, त्याचा सखोल अभ्यास व व्यासंगही खूप मोठा होता. यामुळेच या क्षेत्रातील कर्नाटकस्थित नामवंत दिग्गज व्यक्तींचा ओढा सातत्याने एडनीर येथील मठांत नेहमीच वावर असायचा. याच क्षेत्रांतील नवनवीन कलाकार मंडळींना स्वामीजीसुद्धा निरपेक्षवृत्तीने प्रोत्साहन देत असत व ही कलाकार मंडळीही आपापल्या परीने सातत्याने सेवा साधना अर्पण करण्यास वारंवार एडनीर मठात येत असत.

या आधीच्या स्वामीजींनी एडनीर मठाच्याच परिसरात सुरू केलेली माध्यमिक शाळा व केशवानंद भारती स्वामीजींनी सुरू केलेले महाविद्यालय हे येथील परिसरात लोकप्रिय तर आहेच, परंतु असंख्य पालकांना आपली मुले अत्यंत सुरक्षित वातावरणांत शिकत आहेत, या दोन्ही शैक्षणिक संस्थांचा स्तर गेल्या काही वर्षांत खूपच उंंचावलेला आहे. त्यांच्या मूलभूत हक्कावरील सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल या विषयी हडनीर मठात आम्हाला फारशी काही उत्सुकता नसे किंवा या विषयाबाबत चर्चाही होत नसे. त्यांच्या समवेत असताना या विषयीचा कोठलाच प्रांत आमच्या कोणाच्याही चर्चेत नसायचा. या उलट रोज पहाटे 5 वाजता त्यांचा जो दैनंदिन धार्मिक दिनक्रम सुरू व्हायचा तो पार रात्री उशिरापर्यंत, यातच सहभागी होण्यात आम्हा सर्वांना पर्वणी व भाग्य वाटायचे.

स्वामीजींच्या निष्ठावान भक्तांव्यतिरिक्त तळागाळांपर्यंत असलेल्या गोरगरीब, शेतकरी, मजूर वर्ग, किरकोळ व्यापारी, व्यावसायिक, राजकीय, बँक, वकील, धनाढ्य ते अगदी पार उच्च सरकारी पदावरील सनदी अधिकारी अशा व इतर अनेक क्षेत्रांतील वक्तींचे त्यांच्याशी असलेले हृद्यसंबंध हेही त्याच्याशी व मठातील इतर व्यक्तींशी फोनवर सातत्याने सहज वरचेवर सातत्याने बोलणे होत असे. माझा परिचय त्यांच्याशी साधारण 2005/2006 मध्ये ते पुण्यात कोथरूड येथील श्री श्रृंगेरी मठात चातुर्मासात मुक्कामी असताना झाला. पुढे तो वृद्धिगंत होत गेला व त्यांच्याबरोबर व सहकारीवर्गाशी व एडनीरशी एक आगळेवेगळेच अतूट नाते निर्माण होत गेले.

दोन वर्षांपूर्वी केरळला प्रचंड पाऊस झाला. माझी पत्नी उर्मिला त्याचवेळी एडनीर मठात ती. श्री श्री स्वामींच्या चातुर्मासा निमित्ताने दर्शनाकरिता गेली होती. तिचे रेल्वेचे परतीचे आरक्षण होतेच; परंतु पूर परिस्थितीमुळे त्याचा काही उपयोग होणार नव्हता व झाला ही नाही. जवळजवळ 15 दिवस ती तेथेच अडकून होती. या काळात मठातील सर्वांनीच तिची खूप काळजी घेतली होती. एकतर तेथल्या भाषेची अडचण व तसे सर्वजण अपरिचित; परंतु त्यांची काहीच अडचण झाली नाही. हे सांगायचे कारण म्हणजे ती श्री श्री स्वामीजी व त्यांचे सर्वच सेवाभावी इतक्या प्रेमळ स्वभावाचे होते व आहेत की, त्यांची ममता, प्रीती, लळा, प्रेम आम्हा सर्वांनाच एक जवळीक निर्माण करीत असे. अक्षरशः आम्ही आजोळी आहोत असेच प्रत्येक भेटीत जाणवत होते. येथील गोशाळेतील सर्वच गाईवासरें व त्यांचे ती स्वामीजींवरील प्रेम व श्रद्धासुद्धा तितकीच उत्कट असे. गो पूजेच्यावेळी हे तर अगदी आवर्जून दिसत असे. आज ते आपल्यात नाहीत याची खंत तर आहेच, पण जाता जाता त्यांच्याशी व हडनीर मठाशी निर्माण झालेला घनिष्ठ संबंध ही माझ्या आयुष्यातली आज फार मोठी संपत्ती आहे.

जितेंद्र कळसकर

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा