कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली

देशभरातील जनतेपुढे मोठेच आर्थिक संकट उभे असतानाच कोरोना संकटाने तर जवळपास सगळ्यांचीच आर्थिक घडी संपूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रत्येक जण सरकारकडून मदतीची अपेक्षा बाळगून आहे. आता खरी गरज आहे ती जनतेच्या हातात पैसा असण्याची, की जेणेकरून जनतेची क्रयशक्ती वाढून आर्थिक चक्राला गती मिळेल. मात्र सरकारचा भर हा लोकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलावे, यावर असल्याचेच दिसत आहे. अगोदरच बहुसंख्य जनता ही कर्जबाजारी झाली आहे. त्याच बरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संकटातून संधी शोधण्याचा उपदेश करीत आहेत; मात्र सर्व बाजूंनी ग्रासलेल्या जनतेला संकटाविरुद्ध लढण्याचीही ताकद उरली नाही. अशा वेळी संधी कशी शोधायची. वास्तविक कायमच आपल्या मित्रांना मदत होईल अशी धोरणे राबविताना देशातील जनता पाहत आहे. म्हणूनच तर संपूर्ण जनता आर्थिक कोंडीत सापडली असताना संकटात संधीचा फायदा घेत आहे ते अंबानी आणि अदानी मित्रवर्य. अनेक उद्योगांच्या खरेदीची संधी फक्त हे दोघेच साधू शकतात.

अनंत बोरसे, शहापूर, जि. ठाणे

शिक्षण क्षेत्रात बदल अपेक्षित

भारतात कोरोनाच्या आगमनामुळे सर्वच क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्राचीही वाताहत झाली असल्याचे दिसून येते. जानेवारीत आगमन झालेल्या चालू वर्षातील अगदी लहान केजीपासून ते पदवीच्या परीक्षा घ्याव्यात का, याबाबत संस्था, राज्य-केंद्र सरकारे याबाबत निर्णय घेऊ न शकल्याने, पालक-विद्यार्थी यांच्यात मोठे वादंग सुरू असून जीइई, नीटप्रमाणे एमपीएससीच्या परीक्षांपुढे प्रश्नचिन्ह उभे आहे. इयत्ता 8 वी 9 वीपर्यंतच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष पदरात न पडल्यास पुढील सर्व शैक्षणिक कारकीर्दीवर परिणाम होणार, हे निश्चित आहे. परीक्षेशिवाय पदव्या देणेही योग्य नाही. या शिक्षणातून प्रशासकाची निर्मिती होण्यापेक्षा कार्यकर्त्यांची निर्मितीच होताना दिसत असल्याने, नवनवीन शिक्षण पद्धती निर्माण होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना कधी जाईल माहीत नसल्याने, ही ससेहोलपट सर्वांची होणार हे नक्की.

प्रभाकर धुपकर, पुणे.

वेळीच कठोर कारवाई करा

मुंबईसह महाराष्ट्र हा राज्यघटनेनुसार मराठी भाषिकांचाच आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सध्याच्या डिजिटल युगात समाजमाध्यमांचे वर्चस्व झाले असताना व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वृत्तवाहिन्या घराघरांत पोहोचलेल्या असताना, एका नटाच्या मृत्यूचे भांडवल करून अर्णब गोस्वामीसारखे पत्रकार अरेरावीची भाषा करत सातत्याने महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी करत आहेत. दुसरीकडे कंगना नावाच्या नटीने ट्विटर वरून सातत्याने महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान करण्याचा विडाच उचलला आहे. या लोकांना ताकद देणारे महाराष्ट्रद्रोही कोण आहेत हेही लोकांच्या लक्षात एव्हाना आले आहे. हे लोक महाराष्ट्रविरोधी गरळ ओकतात तेव्हा खरेच खूप वाईट वाटते. सरकारने महाराष्ट्राची बदनामी करणार्‍या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर वेळीच कठोर कायदेशीर करणे गरजेचे आहे.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी, मुंबई

पबजीवर बंदी योग्यच

लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना पबजी या चिनी गेमने वेड लावले होते. या पबजीमुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या पबजी गेमच्या वेडापायी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर काहींचे मानसिक संतुलन बिघडले. गेल्या अनेक महिन्यांपासून या गेमवर बंदी आणावी म्हणून देशभरातून मागणी तर होतीच. टीकटॉक आणि पबजी या दोन अ‍ॅपचे सर्वाधिक वापर केला जायचा हे अ‍ॅपच बंद केल्याने एक प्रकारे भारताने चीनवर पबजी हल्लाच केला, असे म्हणावे लागेल. शिवाय या अ‍ॅपमुळे भविष्यात मुलांवर होणारे दुष्परिणामसुद्धा रोखले गेले.

दत्ता श्रावण खंदारे, धारावी

दुर्मिळ वृक्षांचे जतन

शहरात तसेच रस्त्यालगत व अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या आवारात अनेक दुर्मिळ प्रकारचे वृक्ष आढळून येतात. ही झाडे अनेक वर्षांची व दुर्मिळ आहेत; अशा झाडांचे सरंक्षण व महत्त्व कळावे या हेतूने महाराष्ट्र सरकार अशा झाडांना ‘हेरिटेज’चा दर्जा देणार आहे. काही झाडे तर दोनशे ते तीनशे वर्षांपूर्वीची आहेत. पुणे शहरात अशी अनेक झाडे दुर्मिळ आहेत. पुणे महानगरपालिकेने केलेल्या पाहणीनुसार सुमारे 111 प्रकारचे दुर्मिळ वृक्ष अस्तित्वात आहेत. पर्वतीवर चाफ्याचे एक झाड खूप जुने कित्येक शतकांपूर्वीचे आहे. अंकोल हा दुर्मिळ काटेरी वृक्ष वेताळ टेकडीवर पानझडी खुरट्या जंगलात दिसतो. याच टेकडीवर गणेर हा दुर्मिळ वृक्ष सुद्धा दिसतो. सीताफळ जातीतील हुंब या मोठ्या वृक्षाची केवळ पुण्यात दोनच झाडे आहेत. हिंगण बेटची केवळ दोनच झाडे असून, ती कोंढवा परिसरात आहेत. अशी अनेक प्रकारची झाडे अस्तित्वात आहेत. सर्वसामान्य लोकांना त्याची माहिती नसते. नुकतेच मिरज भागात रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या वेळी सुमारे 400 वर्षांपूर्वीचा एक वटवृक्ष तोडला जाणार होता. अनेक नागरिकांनी व संस्थांनी तो तोडण्यास मज्जाव केला. त्यासाठी आंदोलनही केले. त्याचा परिणाम म्हणजे तो रस्ता वेगळ्या बाजूने वळवून त्या वटवृक्षाला जीवदान दिले. एकूणच दुर्मिळ वृक्ष हा आपल्या संस्कृतीचा एक अमोल सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे जतन करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

शांताराम वाघ, पुणे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा