महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोरोना केंद्र येथे रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली सज्ज करण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या प्रणालीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल व इतर अधिकारी उपस्थित होते.

जम्बो सेंटरचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. येथे अधिक संख्येने बेड सुसज्ज करावेत जेणेकरून कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहाय्य होईल, अशा सूचना महापौरांनी दिल्या. तसेच, शहरातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी जम्बो सेंटर लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. पुणे महापालिकेकडून पूर्ण सहकार्य करण्यात येत असून, आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यात येत आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

नोंदी ठेवणे होणार सुलभ

माहिती व्यवस्थापन प्रणालीमुळे रुग्णांना दाखल करून घेतल्यापासून ते डिस्चार्जपर्यंतच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातात. या व्यवस्थेसाठी कमांड रूम तयार केली आहे. यापूर्वी अशी माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे. आयसीयू व इतर वॉर्डमधील रुग्णांवर प्रत्यक्ष होणारे उपचार, त्यांच्या प्रकृतीची स्थिती यांची माहिती येथील स्क्रीनवर डॉक्टरांना व व्यवस्थापनाला पाहता येईल, असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, रुग्णांचा तपशील अंतर्गत डॅशबोर्डवर अद्ययावत केला जाणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा