नवी दिल्ली : कोरोनाच्या सावटाखाली संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास पहिल्याच दिवशी गालबोट लागले. तब्बल 25 खासदार कोरोनाबाधित आढळले. यामध्ये लोकसभेतील 17 आणि राज्यसभेतील 8 खासदारांचा समावेश आहे. लोकसभेतील कोरोनाग्रस्त खासदारांमध्ये भाजपच्या 12, वायआरएस काँग्रेसच्या 2, शिवसेना, द्रमुक आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

कोरोनाबाधित खासदारांमध्ये मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे, परवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रताप राव जाधव, जनार्दन सिंह, सेल्वम जी, प्रताप राव पाटील, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह आदींचा समावेश आहे.

दरम्यान, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि राजस्तानमधील नागौर मतदारसंघाचे खासदार हनुमान बेनीवाल यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. खुद्द बेनीवाल यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. आधीचा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, नंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या पत्नीचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची तसेच संसद परिसरातील अधिकारी-कर्मचार्‍यांची कोरोना तपासणी करण्यात आली. सूत्रांच्या मते, आरटी-पीसीआर चाचणीत 56 जण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांव्यतिरिक्त संसदेतील अधिकारी आणि प्रसार माध्यमांच्या काही प्रतिनिधींचा समावेश आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत 765 सदस्य आहेत. यापैकी 200 खासदार 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. राज्यसभेत 240 सदस्य आहेत. यातील 97 सदस्य 65 वर्षांवरील आहेत. त्यातही 20 सदस्यांचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक आहे.

लोकसभेतील 130 सदस्यांचे वय 65 पेक्षा अधिक आहे. त्यातही 30 सदस्य 75 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. एका सदस्याचे वय 90 वर्षे इतके आहे. लोकसभेच्या एका खासदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, सात मंत्री आणि दोन डझनहून अधिक खासदारांना आधीच कोरोनाची बाधा झाली आहे.

संपूर्ण देश जवानांसोबत :मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची वाढती संख्या आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाष्य केले. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही, तोपर्यंत खबरदारी महत्त्वाची आहे, असे सांगितले. आपले जवान सीमेवर सज्ज आहेत आणि संपूर्ण सभागृह त्यांच्यासोबत आहे, असे पंतप्रधान यांनी सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनास कालपासून सुरुवात झाली. त्याआधी माध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले, ‘कठीण काळात संसदेचे सत्र सुरू होत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कर्तव्य आहे. खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला. मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. सभागृहात जेवढी सखोल चर्चा होते, त्याचा फायदा देशाला, संसदेला होतो असा प्रत्येकाचा अनुभव आहे. आपण सर्व ही परंपरा पुढे कायम ठेवू.’

निर्मला सीतारामन यांच्या पेहरावावरून टिप्पणी

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगात रॉय यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पेहरावावरून अभद्र टिप्पणी केली. यावरून सोमवारी संसदेत जोरदार गोंधळ झाला. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा मुद्दा उपस्थित करीत तृणमूल खासदार रॉय यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. नंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी रॉय यांचे वक्तव्य कामकाजातून वगळण्यात यावे, असे सांगत प्रकरणावर पडदा टाकला. अर्थमंत्री सीतारामन बँकेसंदर्भातील सुधारणा विधेयक मांडत असताना रॉय यांनी ही टिप्पणी केली. त्यावर, अनेक सदस्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली तसेच गोंधळ घातला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा