शंकर महादेवन यांचे प्रतिपादन
पुणे : हल्ली संगीत केवळ चित्रपटांद्वारे रसिकांपर्यंत पोहचू शकते असे नाही, तर अनेक डिजिटल माध्यमे, समाज माध्यमे उपलब्ध झाली आहेत. ज्यामुळे संगीतकार थेट आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे नवोदित संगीतकार, गायकांनी केवळ चित्रपटांवर अवलंबून न राहता या डिजिटल माध्यमांचाही योग्य वापर करायला हवा, असे मत प्रसिध्द गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केले.
फिक्की फ्लो पुणे चॅप्टरतर्फे गायक शंकर महादेवन यांच्या एका वेबिनारचे आयोजन केले होते. नॅटली शर्मा यांनी महादेवन यांच्याशी संवाद साधला. यावेळी फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस उपस्थित होत्या.
महादेवन म्हणाले, बदलत्या काळानुसार प्रसिद्धीची माध्यमेही बदलत आहेत. प्रत्येक माध्यमाचे फायदे जाणून घेत त्याचा योग्य तो वापर केला तर त्याचा आपल्याला फायदा होतो. मनोरंजनामुळे एकीकडे सीडी, कॅसेटची विक्री कमी झाली. लोक ऑनलाईन संगीत डाऊनलोड करतात. ज्याला हवे तो आपले संगीत थेट रसिकांपर्यंत पोहचवू शकतो. यामुळे संगीत कंपन्यांचे हातपाय पडण्याची गरज आज संगीतकारांना राहिलेली नाही. त्यांच्याशिवायही नवोदितांना आपले संगीत पोहचवता येते. त्यामुळे आपल्याला काय आवडते काय नाही हे सुद्धा रसिक स्वतः ठरवू शकतात.
हा काळ सगळ्यांसाठीच फार कठीण आहे. लहान संगीतकार, गायक ज्यांची उपजीविका ऑर्केस्ट्रा, लग्नसमारंभ यातील कार्यक्रमांवर अवलंबून होती त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रोजच्या धकाधकीतून मिळालेली ही सक्तीची विश्रांती सर्जनात्मक कारणी लावायला हवी. सर्व संगीत प्रकारांचे व्याकरण, पाया म्हणजे शास्त्रीय संगीत आहे. शास्त्रीय संगीत हे एक विशाल सागर आहे. ऑनलाई संगीत अकादमी ही संकल्पना 15 वर्षांपूर्वी अगदीच नवी होती. असेही महादेवन यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा