पुणे : काश्मीरच्या सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. पुण्याच्या बाजारात काश्मीरचे सफरचंद दाखल झाले आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत दर दहा टक्क्यांनी अधिक आहेत. पुढील काही दिवसांत अवाक वाढल्यास दर कमी होतील. असा अंदाज व्यापार्‍यांनी सोमवारी वर्तविला.
मार्केटयार्डातील फळबाजारात देशासह परदेशातून सफरचंदाची आवक होत असते. सध्या हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कोरोनामुळे हिमाचल सफरचंदाचा अपेक्षित हंगाम झाला नाही. आता काश्मीर सफरचंदाची आवक सुरू झाली आहे. सध्या 100 पेटींची आवक होत आहे. चार पाच दिवसांत ही आवक एक हजार पेटींवर जाईल. त्यानंतर पंधरा दिवसांत ही आवक 8 ते 10 हजार पेटींवर जाईल. सध्या बाजारात काश्मीर सफरचंदाच्या 15 किलोच्या पेटीला 1300 ते 1400 रूपये भाव मिळत आहे. मागील वर्षी हे भाव 1200 रूपयांवर होते. तर किरकोळ बाजारात किलोचा दर 140 ते 150 रूपये आहे. आवक वाढल्यानंतर भाव आवाक्यात येतील, अशी माहिती व्यापारी भरत पंजाबी यांनी दिली.
पंजाबी म्हणाले, सुमारे ऑगस्ट महिन्यापासून मार्केटयार्डात हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची आवक सुरू होती. पंधरा दिवसापर्यंत तो हंगाम सुरू राहील. तर, दिवाळीपर्यंत काश्मीर सफरचंदाचा हंगाम असेल. यंदा उत्पादन कमी असून 70 टक्के सफरचंदाला बर्फाचा मारा बसला आहे. तर, 30 टक्के चांगले सफरचंद आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे पंजाबी यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा