संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

भगवत्गीतेत एक श्लोक आहे इंदियाणी पराण्याहू: इंद्रियेभ्य: परंमन: मनसस्तु पराबुध्दी: यो बुध्दे: परतस्तु सह: इंद्रियांच्या पलिकडे मन, मनाच्या पलिकडे बुध्दी, बुध्दीच्या पलिकडे देव याचा अर्थ लोकांनी असा केला की देवाच्या अलिकडे बुध्दी आहे म्हणून तो बुध्दीला आकळता येत नाही पण जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या असे सांगते, बुध्दीच्या पलिकडे देव आहे याचा अन्वयार्थ काय? देवाच्या अलिकडे बुध्दी आहे़. बुध्दी व देव यांच्यामध्ये कुणीच नाही. अडचण काय? बुध्दीची आज देवाकडे पाठ आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही, तो आपल्या अनुभवाला येत नाही, आपल्याला त्याला पहाता येत नाही. मी इथे बसलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे एक मनुष्य बसलेला आहे, तो मला कसा दिसणार? तो दिसण्यासाठी मी वळले पाहिजे. बुध्दीला वळविलेे की देव तिथेच. देव पहावया गेलो तेथे देवची होवूनी ठेलो तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो तुम्ही नुसते बुध्दीला वळविले की देव तिथेच. दुसरी गंमत आहे, तुम्ही बुध्दीला वळविले की देव तुम्हांला ओढून घेतो. लोखंड आणि लोहचुंबक बघा. लोखंड लोहचुंबकापासून लांब ठेवला तर परिणाम काहीच नाही पण जरा जवळ नेण्याचा प्रयत्न करा, थोडेसे हलते. आणखी जवळ नेण्याचा प्रयत्न केला तर आणखी थोडे हलते असे करता करता ते लोहचुंबक लोखंडाला खेचून घेते व एकरूप करून टाकते. तसेच देव पहावया गेलो तेथे देवची होवूनी ठेलो ही स्थिती होते. बुध्दीची देवाकडे पाठ आहे, ती वळविणे हयाला अंतर्मुख म्हणतात. डोळे मिटून बसणे म्हणजे अंतर्मुख होणे नव्हे. अंतर्मुख हयाचा अर्थ तुमची बुध्दी, तुमचे चित्त, तुमचे मन हयाचे मुख देवाकडे झाले पाहिजे. नुसते डोळे मिटून बसलात तर हळूहळू विचार येवू लागतात. अंतर्मुख म्हणजे बुध्दी, चित्त, मन हे देवाला सन्मुख झाले पाहिजे. आज बुध्दीची देवाकडे पाठ आहे त्याचे कारण माणसाला विषयाचा नाद लागलेला आहे. याचा अर्थ विषय नको असे नव्हे. विषयानंद पाहिजे. जेवण नको का? माणसाला सुखाने जगायचे असेल तर जेवण केले पाहिजे, काम केले पाहिजे, घर पाहिजे, सगळे पाहिजे. जीवनविद्या तत्वज्ञान हे नको, ते नको असे म्हणत नाही. हे शरीर आहे. हात नसले तरी चालेल? पाय नसले तरी चालेल? डोळे नसले तरी चालेल? हे सगळे अवयव जे आहेत ते हया शरीराचे वैभव आहे. हयाला अलंकापुरी म्हणतात. शरीराबद्दल संत काय म्हणतात, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. देहाला पंढरी म्हटलेले आहे व आत्म्याला विठ्ठल म्हटलेले आहे. आम्ही यापुढे गेलो, आम्ही म्हणतो, शरीर साक्षात परमेश्वर.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा