सुरेश कोडीतकर : लढा कोरोनाशी-18

पुणे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा हा निरंतर वाढतोय. संसर्गाची साखळी तुटण्याचे नाव घेत नाही. कोरोना संसर्गाचे भान लोकांना अजूनही नाही. संसर्ग नको पण उपभोग हवा. कामधंदा हवा पण काळजी घेणार नाही. यामुळे कोरोना वाढत आहे. आधी अनलॉक करायची घाई, मग पुन्हा लॉकडाऊन, तो उठवण्याचा दबाव, व्यवहार, कामकाज सुरु करण्याचे अटीधारित आदेश, सणासुदीनिमित्त दिलेली सवलत, मॉल उघडल्यानंतर आता व्यायामशाळा, प्रार्थनागृह सुरु करण्याची मागणी आणि या सर्वांच्या अनुषंगाने गोंधळलेले सरकार आणि दिशाहीन प्रशासन असे चित्र आता जनतेला सवयीचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्तांचा आकडा राज्यात वाढतच चालला आहे. त्यातही पुण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाला सामोरे जाण्यासाठी मोठा गाजावाजा करून उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरची अकार्यक्षमता थेट रुग्णांच्या जीवावर बेतली आहे. हे धक्कादायक आहे. जम्बो कोविड सेंटर ही वास्तू फक्त उभारणे महत्वाचे नसून तिथे सर्व वैद्यकीय सुविधा निरंतर उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे, हे कोणाच्या ध्यानात कसे आले नाही ?

रुग्णांचा मृत्यू आणि असंवेदनशीलता

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. रजनी खेडेकर यांनाही जम्बो रुग्णालयात यथायोग्य उपचार मिळाले नाहीत. उपचारांअभावी रुग्णांना तडफडावे लागत असेल तर ही बाब आपले मायबाप आपल्या नागरिकांच्या जिवाकडे किती गांभीर्याने पाहते हे स्पष्ट करते. पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांनासुध्दा रुग्णालय मिळवण्यासाठी यातायात करावी लागली. अनेकांना त्यांच्यासाठी रुग्णालयांना आर्जवं करावी, हे पुण्याची आरोग्य व्यवस्था आणि संवेदना किती खालावली, याचे निदर्शक आहे. त्याच्याही पुढे कहर म्हणजे अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातलगांना मृतदेह घेऊन अनेक स्मशानभूमीत हिंडावे लागले. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वत्र लांब रांग होती. कोरोनाग्रस्तांची संख्या पुण्यात सातत्याने वाढत जाणार आहे हे गृहीत धरून संबंधित सर्व व्यवस्थांची तजवीज करणे आपल्या मायबापांना जमले नाही. रुग्णांना बेडसाठी दारोदार हिंडावे लागणे, औषधे, उपकरणे यांचा अभाव, आरोग्य सेवांची कमतरता, उपचार खर्चाच्या अवास्तव रकमा, अंत्यसंस्कारासाठी रखडपट्टी हे सर्व भयानक, वेदनादायी आहे.

रुग्णवाढ अंदाज आणि उपाय

आपल्या देशात कोरोनाबाधितांची संख्या बेचाळीस लाखांवर पोहचली आहे. कोरोनामुक्तीचे प्रमाण 77.32 टक्के असून मृत्युदर 1.72 टक्के आहे. राज्यात रुग्णसंख्या नऊ लाखाला पार करत आहे. देशात रुग्णवाढ आणि मृत्युदर अधिक असलेल्या पस्तीस जिल्ह्यांमध्ये राज्यातील सतरा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा दोन लाखांपलिकडे पोहचत आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात आहे. पुण्यात सध्या अडीच हजाराच्या पुढे कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. पुण्यात वाढत्या कोविड रुग्णांचा अंदाज लावून आणि एकाच छताखाली उपचार मिळावे या हेतूने जम्बो कोविड केंद्राची कल्पना पुढे आली. 800 रुग्णांच्या सर्व तर्‍हेने परिपूर्ण उपचारांसाठी सुरुवातीला 70 कोटी असलेला उभारणीचा खर्च हा नंतर 100 कोटींवर गेला. गोडाऊनरुपी रुग्णालयाच्या दारात बाउन्सर्स ठेवणे हा प्रकार रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची अवहेलना आणि रुग्णसेवा या व्रताची चेष्टा करणारा ठरला. कोरोनाग्रस्तांच्या सेवेत रुग्णालय पहिल्याच प्रयत्नात अनुत्तीर्ण ठरले याचे दुःखं आहे.

पीएमआरडीएची भूमिका

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएची स्थापना ही पुण्याच्या महानगर म्हणुन नियोजनबध्द विकास आणि नियंत्रण यासाठी करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका तसेच तीनही कॅन्टोंमेंट जसे की लष्कर, खडकी आणि देहूरोड वगळून पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र ठरवण्यात आले. त्यात काही तालुके पूर्णतः तर काही अंशतः समाविष्ट आहेत. जर पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र पुणे महापालिका क्षेत्राबाहेर आहे तर मग पुणे शहरात जम्बो रुग्णालय उभारणीच्या कामाचा आणि पीएमआर-डीएचा संबंध काय ? कार्यक्षेत्र आणि जबाबदारी निश्चित असताना जम्बो हॉस्पिटल उभारणीचे काम पीएमआरडीने स्वतःकडे घेणे अथवा त्यांच्यावर लादणे, दोन्हीही गैर आहे.पण ही अनियमितता घडली आहे. यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा. जे घडले ते ‘यंत्रणा स्थापनेचा मूळ उद्देश्य, कायदा, नियम याला धरून नाही. महापालिकेच्या हद्दीत त्यांचा स्वतःचा आरोग्य विभाग आणि सर्व पायाभूत सुविधा असताना जम्बो रुग्णालय उभारणी यापासून महापालिका अलिप्त राहते आणि पीएमआरडीए त्यात राबते हे अजब तर्कशास्त्र आहे.

रुग्णालय उभारणीत या घटकांकडे दुर्लक्ष

देशात साथ निवारण कायदा आणि आपत्ती निवारण कायदा अस्तित्वात आहे. संसर्गजन्य आजार विशेषज्ञ समिती, या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. आरोग्य सेवेतील वरिष्ठ डॉक्टर आणि ससूनसारखे रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये हे सर्व दिमतीला असताना त्यांची सेवा आणि मार्गदर्शन जम्बो रुग्णालयासाठी का घेण्यात आले नाही ? पीएमआरडीएकडे स्वतःचा आरोग्य विभागच नाही. मग पीएमआरडीएने जम्बो रुग्णालय उभारणे, वैद्यकीय, संलग्न, पूरक सेवांची जुळवाजुळव आणि व्यवस्थापन करणे हे काम का स्वीकारले ? मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी कुठेही कोरोना रुग्णालयाची उभारणी केल्याचे ऐकिवात नाही. सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि राज्य शासनाच्या आरोग्य सेवांनीच काम केले आहे. बृहन पुण्यातही दोन महापालिका आणि कॅन्टोंमेंट आहेत. त्यांची आणि शासनाची स्वतंत्र आरोग्य यंत्रणा आहे. शिवाय संरक्षण मंत्रालयाचे वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयेही आहेत. तरीही पुणेकरांना कोरोनाची लढाई कष्टप्रद ठरुन जीवावर का बेतत आहे?

महापालिकेची रुग्णालये ही पांढरा हत्ती

पुण्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या लवकरच वीस हजार आणि मृतांची संख्या तीन हजार आकडा गाठणार आहे. पुण्यात महापालिकेचे एकमेव संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय आहे आणि ते म्हणजे डॉ नायडू रुग्णालय. यापलिकडे पालिकेच्या इतर सर्व रुग्णालयात जसे की कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ, सोनवणे रुग्णालय, भवानी पेठ, राजीव गांधी आणि कर्णे रुग्णालय, येरवडा तसेच गाडीखाना, मंडई या रुग्णालयांची काय परिस्थिती आहे ? ही आणि शहरातील इतर सर्व रुग्णालये कोरोनाच्या प्रकोपात कामाला येत आहेत का ? का ही रुग्णालये फक्त पांढरा हत्ती ठरत आहेत ? जनतेच्या कररुपी पैश्यातून गल्लीबोळात दवाखाने आणि रुग्णालये उभारली असतील, तर ती या कोरोनाकाळात उपयोगात का आली नाहीत ? इतक्या वर्षात या दवाखान्यांना सक्षम का केले गेले नाही ? आज कोरोनाने डोके वर काढले आणि नागरिकांची तारांबळ उडाली. त्यात महापालिकेचे सहाय्य सर्वोपरी ठरायला हवे होते. पण तसे झाले नाही. कारण आरोग्य या विषयाला आपल्या मायबापांनी कधी महत्वच नाही.

महाराष्ट्र हे पुढारलेले राज्य आहे; पण सकल उत्पन्नाच्या एक टक्काही खर्च महाराष्ट्रात आरोग्यावर केला जात नाही. राज्याचा आरोग्य सेवेचा बृहत आराखडा हा सन 1991 च्या जनगणनेवर आधारित आहे. त्यानुसार अद्यापही काम होत आहे. गेल्या 30 वर्षात झालेली लोकसंख्या वाढ आरोग्य खात्याने विचारात घेतलेली नाही. यापेक्षा चिंतेचा विषय म्हणजे आरोग्य विभागात वर्ग अ ते ड मिळून एकूण 17 हजार 337 पदे रिक्त आहेत. कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांची भरती करून आरोग्य विभागाचा गाडा राज्यात अनेक वर्षे हाकलला जात आहे. त्यामुळे जनतेला चांगल्या उपचारांपासून वंचित रहावे लागत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि आदिवासी दुर्गम भागात काम करणारे भरारी पथक मिळून एकूण तीन हजार डॉक्टर अल्प मानधनावर काम करत आहेत. आज आरोग्य विभागात महत्वाची पूरक सेवा देणारे वर्ग तीन आणि चारचे मिळून एकूण 35 हजार सेवक कंत्राटी पद्धतीने कमी पगारावर काम करत आहेत. कोरोना संसर्गाच्या या धोकादायक काळात आपल्या आरोग्य व्यवस्थेचे हे हाल आहेत.

मायबाप गंभीर नव्हते?

जम्बो रुग्णालय उभारले आणि त्याचे व्यवस्थापन चुकले आणि त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना मानसिक त्रास सहन करावा लागला. आता महापालिकेने सर्व सूत्रे ताब्यात घेतली आहेत. आधीचे कंत्राट रद्द करून अननुभवी संस्थेची हकालपट्टी करून दोन नव्या अनुभवी संस्थांना प्रत्येकी चारशे खाटांची व्यवस्था पाहण्याचे काम देण्यात आले आहे. रुग्णालय आता सुचारुपणे कामाला लागले आहे. जम्बो रुग्णालयाच्या या सर्व घडामोडी आश्वासक आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होतो की हे सर्व आधी का करण्यात आले नाही ? जम्बो रुग्णालयात तत्परतेने दखल घ्यायला कोणी नसणे, उपचार न होणे, कोणतीही सेवा, सुविधा नसणे, आप्तजनांचे हाल होणे, कागदपत्रांची सुलभता नसणे, रुग्ण दगावणे आणि इतरांना मनःस्ताप हे सर्व का घडले ? कोरोनाच्या भीषण आव्हानात जम्बो रुग्णालयाने पुणेकरांचा अपेक्षाभंग केला. पुण्यात गेल्या काही महिन्यात कोरोना गंभीर रूप धारण करत असताना पुण्याकडे लक्ष द्यायला मायबापांना सवड नाही.

पुण्यातील रुग्णालये

पुणे, कोरोना आणि जम्बो रुग्णालय ही चर्चा करत असतानाच आपण पुण्यातील रुग्णालयांचा इतिहास अभ्यासला पाहिजे. त्यातुन काही शिकले पाहिजे. बगदादहून परागंदा झालेले ज्यू समाजाचे डेव्हिड ससून यांचा भारतात व्यापार होता. त्यांचे पार्टनर होते पारसी जमशेदजी जीजीभॉय. या दोघांनी धंद्यात बक्कळ पैसा कमावला. त्याचा सदुपयोग त्यांनी गोरगरीबांसाठी रुग्णालय उभारण्यात केला. सन 1867 मधे उभे राहिले डेव्हिड ससून रुग्णालय. दुसरे पारसी उद्योजक मुंबईचे बैरामजी जीजीभॉय यांनी या ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोटे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र सुरु केले होते. सन 1871 मधे सुरु झालेल्या या केंद्राचेच रुपांतर पुढे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. अडलजी कोयाजी यांना पारसी समाजातील उद्योगपती जसे की वाडिया यांनी आर्थिक मदत केली तर कोवासजी जहांगीर आणि लेडी हिराबाई यांनी जागा दिली. त्यांच्या मुलाचं नाव या अत्याधुनिक रुग्णालयाला देण्यात आलं आणि उभं राहिलं, जहांगीर रुग्णालय.

केकी बैरामजी यांनी चार खाटांचं स्वतःच रुग्णालय सुरु केलं. तत्कालीन गव्हर्नर यांनी त्यांना जागा दिली. त्यांच्या बायकोच्या स्मरणार्थ रुग्णालयाचे नाव रुबी हॉल क्लिनिक असे ठेवण्यात आले. रास्ता पेठेतील सरदार मुदलियार यांना त्यांच्या मालकीचं प्रसूतीगृह चालवणं अवघड झालं होतं. त्यांनी जहांगीर रुग्णालयाच्या अडलजी कोयाजी यांना लक्ष घालण्याची विंनती केली. त्यांनी आपली उच्च विद्याविभूषित वहिनी डॉ बानू कोयाजी हिच्याकडे ही जबाबदारी सोपवली. मग पुढे हे प्रसूतीगृह अर्थात के. ई .एम (किंग एडवर्ड मेमोरिअल) रुग्णालय हेच त्यांचे आयुष्यभराचे काम बनले. सायरस पूनावाला यांनी औषध निर्मिती क्षेत्रात (सिरम कंपनी) खुप नाव कमावून पुण्याचा गौरव वाढवला आहे.

डॉ. नायडू संसर्गजन्य आजार रुग्णालय

मुंबईत आलेली प्लेगची साथ 19 डिसेंबर 1896 रोजी पुण्यात पोहचली. चार वर्षात 17231 जणांचा मृत्यू झाला. सन 1900 मधे तत्कालीन पुणे नगरपालिका, उपनगर पालिका आणि पुणे कॅन्टोंमेंट या तिघांनी मिळून शहराबाहेर संगमाजवळ प्लेगचे रुग्णालय उभारले. सन 1940 पर्यंत पुण्यात प्लेगची साथ येतंच होती. सन 1934 मधे 1079 जण दगावले. प्लेग प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष होते डॉ नायडू. त्यांनी त्यावेळी केलेल्या कामाची पावती म्हणुन रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले. नंतर या रुग्णालयात क्षयाचे रुग्णही ठेवण्यात येत असत. संसर्गजन्य रुग्णालय म्हणून डॉ नायडू रुग्णालयाने अथक सेवा बजावली आहे. कोरोनाच्या साथीतही डॉ नायडू रुग्णालय पुणेकरांच्या मदतीला धावून आले आहे.

आज खासगी रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजूंना देत नाही. आवश्यक इंजेक्शनचा पुण्यात तुटवडा आहे. टेस्टिंगचे काम जोरकसपणे सुरु आहे. मास्क न वापरणारे यांच्यावर कारवाई केली जात आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अनलॉक केल्यानंतर प्रसार अधिक वेगाने झालाय. कोरोनाबाबत पुरेशी सावधानता आजही बाळगली जात नाही. सार्वजानिक स्तरावरील हे अपयश लक्षात घेऊनच जम्बो रुग्णालयाचा विचार पुढे आला होता. त्याच्या कार्यान्वयनात काही त्रुटी सुरुवातीला निर्माण झाल्या असतील. पण आता पुढे जायला हवे. पुणेकरांच्या जीवाशी खेळ होता कामा नये. पुण्यातील वाढत्या कोरोनाची देशभर चर्चा आहे. पुणेकर तर चिंतेत आहेतच. जम्बो रुग्णालयाने यापुढे तरी चांगले काम करून पुणेकरांना दिलासा द्यावा, ही अपेक्षा वाजवी म्हणायला हवी.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा