विश्रांतवाडी : लोहगाव डोंगराकडून येणारे ओढे-नाले बुजवल्याने तीन दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे धानोरी परिसरातील इमारतीत तसेच घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तरांबळ उडाली. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहरात तीन-चार दिवसांपासून दररोज संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी परिसरात नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने चेंबरमधून पाणी बाहेर येत आहे. तसेच, पावसाळी पाईप लाईन बंद असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठून राहिल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना, विशेषतः दुचाकीचालकांना फार कसरत करावी लागली. शिवाय लोहगाव भागातून येणारे प्राचीन ओढे नाले बुजवल्याने धानोरीत अनेक ठिकाणी सोसायटीत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

धानोरी येथील भरत ढाब्याजवळील गोयल गंगा ग्रुपच्या गंगा आर्या या सोसायटीत पावसाचे पाणी शिरले आहे. मागील वर्षीही सोसायटीत पाणी शिरले होते. नंतर सीमाभिंत बांधण्यात आली. तरीही सोसायटीत पाणी शिरले आहे. महापालिकेच्या चुकीच्या कारभारामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले. विकासक आणि महापालिका यांच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे असल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली आहे.

इमारतीत एकूण 35 कुटुंबे राहत असून त्यात लहान मुले, नवजात बालके व वृद्धांचाही समावेश आहे. पाणी खूप असल्याने नागरिकांना 10-12 तास घराबाहेर पडता येत नाही. नैसर्गिक ओढे, नाले बुजवल्याने डोंगरातून येणार्‍या पाण्याचा निचरा होण्यास जागाच पाणी घरात व इमारतीत शिरत आहे. शासनाने तातडीने लक्ष देऊन अनधिकृत बांधकामे व इमारतींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक करत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा