महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी

पुणे : पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील खाटांची माहिती आणि उपलब्धता एकाच छत्राखाली आणून खाटा मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भात तातडीने कार्यवाही होण्याची शक्यता असून यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

कोरोना संसर्ग आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी महापौर मोहोळ यांनी ही मागणी केली आहे. यावेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची मागणीही वाढत असून सर्वसामान्य रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ’रुग्णांचा खाटा उपलब्ध होण्यासाठी तातडीने केंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ही पद्धत अवलंबल्यास रुग्णांना खाटा उपलब्ध होऊ शकतील.’

पुणे शहरात दररोज 6 हजार पेक्षा जास्त चाचण्या होत असल्या तरी त्यात सरकारी संस्थांकडून होणार्‍या आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या तुलनेने कमी असून यावर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. यासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवावी. यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यात मदत होऊ शकेल’ असेही महापौर मोहोळ म्हणाले.

संसर्गाच्या अंदाजकडे महापौरांनी वेधले लक्ष

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच्या काळात नजीकच्या काळातील अंदाज बांधून रुग्णसंख्या आणि संभाव्य खाटांची माहिती बैठकीत उपलब्ध केली जात होती. त्या आधारावर नियोजन करणे सहज शक्य होते. मात्र गेल्या तीन बैठकांमध्ये ही माहिती सादर होत नसल्याने महापौर मोहोळ यांनी समोर आणले. विशेष म्हणजे जम्बो रुग्णालयाची निर्मिती याच अंदाजाच्या आधारावर करण्यात आली होती.

’जम्बो’ आणि बाणेर केंद्र पूर्ण क्षमतेने लवकर सुरू करा

’जम्बो’चा गाडा आता रुळावर येत असला तरी नियोजित क्षमतेनुसार जम्बो आणि बाणेर केंद्राचे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स कमीत कमी कालावधीत उपलब्ध करा, अशीही सूचना महापौर मोहोळ यांनी बैठकीत केली. जम्बो आणि बाणेरचे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा