कोरोना रुग्णांना दिलासा न मिळाल्यास कारवाई

पुणे : जम्बो रुग्णालयाबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो रुग्णालयबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

पुण्यातील विधानभवन सभागृहात शुक्रवारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उमुख्यमंत्री पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचना केल्या. पवार पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी राज्य सरकार सर्व प्रकारे मदत करीत असून, दोनही महापालिकेच्या आरोग्य विभागानेदेखील सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्येदेखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकार्‍यावर कामाचा ताण येवू नये, तसेच कामात गतिमानता येण्याच्या दृष्टीने विषयनिहाय जबाबदार्‍या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे.

विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करावे. ऑक्सिजन टँकरचा वाहतूक दरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकर अ‍ॅम्ब्युलन्सप्रमाणे सायरनची व्यवस्था करावी, पोलिस विभागाने ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून हे टँकर वाहतूककोंडीतून जलदगतीने बाहेर पडतील.

जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील 50 टक्के निधी कोविड नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी वापरून कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे सांगून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे नियोजन करावे, तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार कोरोना रुग्णावर उपचार होत असल्याची खात्री करावी.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा