रस्ते जलमय; सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी

पुणे : मागील काही दिवसांपासून शहरात रोजच पाऊस पडत आहे. बुधवारी पुन्हा एकदा जोरदार पावसामुळे पुणे जलमय झाले. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले, तर अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. तसेच काही वसाहतीतील घरांतही पाणी शिरले. अतिपावसामुळे काही भागात झाडे आणि झाडांच्या फांद्या तुटल्याच्याही घटना घडल्या. रात्री रस्त्यांवरील वाहत्या पाण्यामुळे वाहन चालकांना गाडी चालविणे अशक्य झाले. शहरातील बहुतांश महत्त्वाच्या चौकांत पाणीच पाणी झाले होते. वाहत्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेकांना पाऊस थांबेपर्यंत आहे त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागली.

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात सायंकाळी जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे तासभर पाऊस पडल्यानंतर रात्री जोरदार पावसाचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. पावसामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने वाहन चालकांना वाहने कडेला लावावी लागली. अवघ्या काही मिनिटातच अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे रस्त्याने पायी चालणेही अशक्य होत होते. रात्री उशिरापर्यंत पावसाचे सातत्य कायम होते. अतिपावसामुळे मध्यवस्तीतील बहुतांश रस्त्यांवरील वाहनांची ये-जा थांबली होती. पावसामुळे महत्त्वाच्या चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडली होती.

शहरात रोजच कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काल दुपारी अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. तर पावसामुळे दुचाकी चालकांनाही वाहने कडेला लावून आडोशाला थांबावे लागले. तर चारचाकी चालकांनाही वाहन चालविताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. सुमारे आर्धा तास पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतर मात्र वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले. विशेषत: दुपारी कर्वेनगर, कोथरूड, चांदणी चौक, वारजे-माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, सनसिटी, कात्रज, सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, शिवाजीनगर, आंबेगाव परिसरात पाऊस पडला.

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा प्रभाव राज्यावर असल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडत आहे. राज्यात अद्याप मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाची हजेरी कायम असणार आहे. मान्सून सक्रिय असल्याने अद्याप तरी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

आजही पावसाचा अंदाज

शहरात पावसाची हजेरी कायम आहे. आज (गुरुवारी) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच, जिल्ह्यातील घाटमाथा विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, येत्या 15 सप्टेंबरपर्यंत शहर आणि परिसरात रोजच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 2 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर 1 जूनपासून 642.7 मि.मी. पाऊस पडला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा