मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिला अमली पदार्थांच्या सेवनासह इतर आरोपांखाली मंगळवारी अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. दरम्यान, न्यायालयाने रियाला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली.

मागच्या तीन दिवसांपासून रियाची एनसीबी चौकशी करत होती. याच प्रकरणात रियाचा भाऊ शौविक, सुशांतसिंहचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा आणि सुशांतचा नोकर दीपेश सावंत यांना यापूर्वीच अटक झाली आहे. सध्या ते तिघेही कोठडीत आहेत.

दरम्यान, अटकेनंतर रियाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यासाठी तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले. रियाची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली असल्याचे समजते.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अमली पदार्थांशी संबंधित बाबी आढळून आल्या. यात रियाचे नाव समोर आले. याच संदर्भात तिची तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे काल रियाला अटक करण्यात आली. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.

२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने 10 दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने सांगितले होते.

व्यसनी व्यक्तीवर प्रेम केल्याची शिक्षा

एका महिलेने अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या व्यक्तीवर प्रेम केले म्हणून तीन तपास यंत्रणा तिच्या मागे लागल्या आहेत. सुशांत अनेक वर्षे मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि बंदी असलेली औषधे घेतल्यामुळे त्याने आत्महत्या केली होती. प्रेम करणे गुन्हा असेल, तर या गुन्ह्यासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही, अशी प्रतिक्रिया रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा