पुणे : शहर आणि परिसरात पावसाचे सातत्य कायम आहे. गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. दुपारी पावसाचा वेग वाढल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ग्राहकांची संख्या घटल्याने व्यवहार मंदावले होते. तुळशीबाग, बोहरी आळी, महात्मा फुले मंइई परिसरात शांतता पाहण्यास मिळाली. पावसामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली होती. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात 7.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.
शहरात सकाळीच पावसाला सुरूवात झाल्याने घराबाहेर पडणार्‍यांचे प्रमाण घटले होते. पावसामुळे अनेकांनी नियोजित कामे रद्द केली. कार्यालये, संस्था, दुकानात काम करणार्‍यांना भिजतच निश्चित स्थळी पोहचावे लागले. त्यामुळे सकाळपासूनच मध्य वस्तीतील व्यवहावर परिणाम झाला. नेहमीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, सिंहगड रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यांवर पावसामुळे सकाळी तसेच सायंकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.
दुपारी पावसाचा वेग वाढल्याने वाहन चालकांना वाहने कडेला लावून आश्रयाला थांबावे लागले. पावसामुळे काही रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पावसात वाहन चालविताना खड्डे चुकविण्याची कसरत वाहन चालकांना करावी लागत होती. तर महत्त्वाच्या चौकातील सिग्नल बंद पडल्याने पावसात थांबून वाहतूक पोलिसांना वाहन चालकांना मार्गदर्शन करावे लागले. पावसाच्या सातत्यामुळे अनेकांना गुरूवारी घराबाहेर पडता आले नाही. येत्या बुधवारपर्यंत शहरात रोजच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच घाटमाथा परिसरात जोरदार ते मुसलधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 1 जूनपासून कालपर्यंत 485.3 मि.मी. पाऊस पडला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पाऊस पडत आहे. उद्या (शुक्रवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि घाट विभागात जोरदार पाऊस पडणार आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा