आधुनिक भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात लोकमान्य टिळक हे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे कार्य आजही देशवासीयांना प्रेरणा देत असून भविष्यातही वर्षानुवर्षे त्यांचे विचार समाजावर अधिराज्य गाजवतील.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी निर्भीडपणे ब्रिटिशांविरोधात लढा दिला होता. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच‘ या टिळकांच्या गर्जनेमुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या मागणीने जोर धरला होता. देशातील सर्व इतर मागण्यांसाठी प्रतीक्षा करता येईल. मात्र, स्वातंत्र्यासाठी प्रतीक्षा करणे कदापि शक्य नाही, असा विचार त्यांनी रुजवला. त्यांनी लेखन आणि भाषणांच्या माध्यमातून सतत ब्रिटिश सरकारला जाब विचारला. ब्रिटिशांनी विरोध दडपण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले. मात्र, तुरुंगात राहूनही ब्रिटिशांविरोधात त्यांचे स्वातंत्र्ययुद्ध सुरूच होते.

लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. विद्वान, लेखक, गणितज्ञ, आंदोलक, कार्यकर्ते अशा विविध रुपांमध्ये त्यांचा ठसा आजही कायम आहे. प्राचीन इतिहासाबरोबरच आधुनिक विज्ञानाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकमान्यांचे विचार आजही समाजात स्फुल्लिंग चेतवण्याचे कार्य करतात. महात्मा गांधी यांच्याप्रमाणे लोकमान्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. लोकमान्य केवळ भारताच्या स्वातंत्र्यापुरते मर्यादित नसून त्यांच्या विचारांमुळे देशवासीयांच्या स्वप्नातील भारताची रचना साकारली गेली आहे. भारताचे प्रतिष्ठित सुपुत्र आणि भारतीयांच्या अंतर्गत प्रेरणेला जागृत करणार्‍या लोकमान्य टिळकांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आदरांजली…

सोनिया गांधी अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा