पुणे : लोकमान्यांच्या विचाराला वैचारिक आणि तात्विक अधिष्ठान होते. त्यामुळे त्यांचे विचार कालातीत आहेत. त्यांनी मांडलेल्या विचारातच आधुनिक भारताचे बीज आहे, अशी भावना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांनी शनिवारी व्यक्त केली.
लोकमान्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दोन दिवसांच्या वेबीनार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात डॉ. टिळक बोलत होते. लोकमान्यांच्या विचारात काळाची उत्तरे होती. ‘स्वराज्याची सर सुराज्यात नाही’, असे लोकमान्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच लोकमान्यांचे विचार अद्भुत असल्याचेही डॉ. टिळक यांनी नमुद केले.
देशात शिक्षण व्यवस्था कशी असावी, शेती-उद्योगाचे स्वरूप कसे हवे, सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती कशी केली जावी, लष्कराची रचना कशी असावी, आरोग्य यंत्रणा, स्त्री-पुरुष समानता, भाषा व संस्कृती, ग्रामपंचायत, प्रांतांची रचना या सर्व व्यवस्थेबाबत लोकमान्यांनी 140 वर्षांपूर्वी विचार मांडले होते, असेही ते म्हणाले.
डॉ. टिळक म्हणाले, लोकमान्यांनी 1918 मध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. तो जाहीरनामा म्हणजे एका अर्थाने आधुनिक भारताची आखणीच होती. राज्य व भाषावार प्रांतरचना, राज्य व केंद्राच्या संबंधाविषयी सविस्तर भाष्य केले आहे. राष्ट्राची संस्कृती, भाषा अभिमान हे लोकमान्यांना अभिप्रेत होते. शिक्षणात राष्ट्राचे हित आहे. त्यामुळे त्यात लिंगभेद न करता सर्वांना मोफत शिक्षण मिळावे, असा लोकमान्यांचा आग्रह होता. प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण कसे असावे, शाळा महाविद्यालयांची रचना कशी असावी, याबाबतही लोकमान्यांनी भाष्य केले आहे. तसेच स्वतंत्र आरोग्य विभाग असावा. या विभागाला मंत्री असावा, अशी मागणीही लोकमान्यांनी ब्रिटिशांकडे केली होती. उद्योग-धंदे, आयात-निर्यातीचे नियम, शेती विकास, शेती अवजारे, बी-बियाणे, प्रक्रिया उद्योगाच्या स्वरूपाविषयी लोकमान्यांनी अग्रलेख लिहिले. ग्रामपंचायत आणि प्रांताची रचना कशी असावी, त्यांच्याकडे कोणते अधिकार असावेत, याबाबतही लोकमान्यांनी जाहीरनाम्यात सविस्तर विचार मांडले आहेत.
अतिशय सोप्या भाषेत लोकमान्यांनी भारतीयांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या विचारात राष्ट्रीय शिक्षण अंतर्भूत होते. शिक्षणात प्राचीन व आधुनिक विद्या, भाषा आणि गणिताचा समावेश होता. तंत्रशिक्षण आणि संशोधनाचा त्यात समावेश नव्हता. लोकमान्यांनीच व्यापार, नीती, धर्म शिक्षणाची व्याख्या सांगितली. राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण किती महत्त्वाचे ठरते, हे पटवून दिले. संसारात राहूनही देशभक्तीचे कर्तव्य बजावता येते, याची जाणीवही प्रथम लोकमान्यांनीच करून दिली. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार असावा, ही भूमिकाही लोकमान्यांनीच मांडली. प्रजेचे राज्य निर्माण व्हावे आणि ते प्रजातंत्रानुसार चालावे, हे विचार लोकमान्यांनीच मांडले. टिळक विचाराला अधिष्ठान आहे. म्हणूनच टिळक विचार कालातीत आहेत. आधुनिक भारताच्या वाटचालीत ते प्रेरक व मार्गदर्शक ठरतात, असेही डॉ. टिळक यांनी सांगितले.
स्वदेशी चळवळ देशासाठी आवश्यक ः सोनम वांगचुक
लोकमान्य टिळक यांनी 1905 मध्ये भारताला स्वदेशी आणि बहिष्कार हे दोन महत्त्वाचे मूलमंत्र दिले. भारताच्या विकासासाठी स्वदेशी चळवळीची आवश्यकता त्यांनी आधीच जाणली होती. लोकमान्यांच्या याच मूलमंत्राचे महत्त्व मी अनेक वर्षांपासून पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. स्वदेशीच्या मूलमंत्रावरच आज स्वयंपूर्ण भारत ही संकल्पना उभी राहिली आहे. त्यातूनच भारतात तयार होणार्‍या अनेक वस्तू इतर देशांच्या वस्तूंच्या तुलनेत कमी दरात उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन लडाख येथील प्रख्यात शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी केले. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपणास अतिशय आनंद होत असल्याच्या भावना वांगचुक यांनी यावेळी व्यक्त केल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा