पुणे ः देशाची अखंडता, संस्कृती, परंपरा, भाषा यावरच खरा ‘राष्ट्रवाद’ अबलंबून असला पाहिजे, या विचारांनी भारताला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. शंभरवर्षानंतरही त्यांचे विचार कालातीत असून नव्या पिढीने लोकमांन्यांचे चरित्र अभ्यासून त्यांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले.
लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीनिमित्त पराराष्ट्र मंत्रालयाशी संबंधीत भारतीय सांस्कृतिक परिषदेतर्फे आयोजित ’लोकमान्य टिळक-स्वराज्य ते आत्मनिर्भर भारत’ या विषयावर जागतिक परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी शहा ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून बोलत होते. खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, अर्थशास्त्रज्ञ डॉ. व्ही. के. मल्होत्रा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी विनेश पटनायक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे तसेच लंडन, रंगून, पुणे, मुंबई, अहमदाबाद, कुरुक्षेत्र, दिल्ली, रायपूर, चेन्नई आदी ठिकाणांहून तज्ज्ञ सहभागी होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषद, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस् या संस्थांचा देखील या वेबीनारमध्ये समावेश होता.
शहा म्हणाले, लोकमांन्यांची राष्ट्रभक्ती केवळ ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देईपर्यंत नव्हती. तर समाजसेवा, व्यक्तीमत्व विकास, देशाची संस्कृती परंपरा अबाधित राहून देश आत्मनिर्भर कसा होईल, हा त्यांचा मुळ हेतू होते. तुरुंगात गेले तरी त्यांनी भविष्यातील देश कसा असेल, संस्कृती, परंपरा या टिकावी या विचाराने प्रेरीत होऊन ‘कर्मयोगचा’ सिद्धांत म्हणून होऊन ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ सोप्या भाषेत लिहीला.
देश पारतंत्र्यात असताना काँग्रेसच्या आंदोलनांना वास्तविक बळ केवळ लोकमान्य टिळकांमुळे प्राप्त झाले. त्यामुळेच महात्मा गांधींपासून ते आगरकर, मदन मोहन मालवीय हे सर्व लोकमांन्यांच्या विचारांनी प्रेरीत होते. स्पृष्य अस्पृष्यता झुगारून मानसातच देव आहे, बाल विवाहात मुलीचे वय योग्य असावे, भविष्यात देशाची ‘दशा’ आणि ‘दिशा’ ठरवून ’आत्मनिर्भर भारत’ कसा होईल असे कर्मयोग सांगणार्‍या लोकमान्यांचा हा इतिहास मात्र अंधारात ठेवला जातो, अशी खंत शहा यांनी व्यक्त केली.
उत्तम वक्ते, राजकारणी, व्यासंगी, पत्रकार, असे बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या लोकमान्यांनी उत्तुंग शिखर गाठले तरी जमिनीशी नाळ तुटू दिली नाही. ‘मरण’ आणि ’स्मरण’ यामध्ये एका आद्याक्षऱाचा फरक आहे. त्यामुळे लोकमान्य जाऊन एक शतक उलटले तरी त्यांचे स्मरण अजुनही कायम आहे. त्यांचे विचार अजुनही चीरतरुण आहेत. हे चीरतरूण विचार प्रत्यक्षात अंगीकृत केल्यास लोकमांन्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शहा म्हणाले.
स्वतः बनविलेल्या वस्तूबाबत वेगळाच अनुभव असतो म्हणून स्वदेशीचा नारा देणार्‍या लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनुसार देशा सध्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. तसेच देशातील समाजाच्या एकसंधतेसाठी ‘स्वभाषा’ आणि ’स्वभूषा’ आत्मसात करावी यासाठी लोकमान्य आग्रही होते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील स्वः ओळखावा, त्यानंतर आत्म परिचय करून वाटचाल करावी, असे डॉ..सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. कुंटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयीन तरुण लोकमान्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले. तर पटनायक यांनी शिक्षण, संस्कृती आणि माध्यमे हीच देशाची प्रमुख शस्त्रे असल्याचे लोकमांन्या्ंनी सांगितले असून तरुणांनी या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे सांगत उपस्थितांचे आभार मानले.

सिंहगर्जनेचे सुवर्णशब्द देश असेपर्यंत राहतील
आजही स्वतंत्र भारताच्या आंदोलनाचा विचार मनात येतो किंवा आठवतो तेव्हा प्रथम पुणेरी पगडी, शुभ्र धोती, कुडता आणि पांढरे उपरणे, हातात छडी आणि झुबकेदार मिशा असणारे प्रतिभाशाली व्यक्तीमत्व मृत्यूच्या शतकानंतरही समोर येऊन स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे कार्य आठवते. एकोणिसाव्या शतकात ब्रिटीशांना उद्देशून ’स्वराज्य हा माझा ज्न्मसिद्ध हक्क आहे…’ अशी सिंहगर्जना करणे सोपे नव्हते. हे सिंहगर्जनेचे सुवर्णशब्द जोपर्यंत देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहील तोपर्यंत ते चिरंजीव राहतील, असे गौरवोद्गारही शहा यांनी काढले.

शिक्षणाद्वारे देश उज्वल करावा
आत्मनिर्भर भारत, मॉडर्न इंडिया, स्वदेशी, स्वराज्य या संकल्पना लोकमान्यांनी त्या काळात मांडल्या. परंतु, त्यांच्या पश्चात शंभर वर्षानंतर भारत त्यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी प्रथम तरुणांनी स्वतःला ओळखले पाहिजे. शिक्षण हेच देशाचे भविष्य घडवू शकते म्हणून उत्तम शिक्षण ग्रहण करून त्याचा उपयोग देशासाठी करुन देश उज्वल करावा. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी या्ंनी देखील आत्मनिर्भर भारतासाठी भारताला संदेश देऊन वाटचाल सुरु केली असल्याचे डॅा. टिळक यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा